Pimpri : कामात दिरंगाई करणा-या विद्युत विभागाच्या तीन अभियंत्यांना आयुक्तांचा ‘शॉक’

100 रुपये दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील पदव्युत्तर संस्थेच्या कामामध्ये दुर्लक्ष करणे विद्युत विभागाच्या तीन अभियंत्यांना चांगलेच महागात पडले आहे. कामात बेजबाबदारपणा, मुदतीत काम न करता दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत तिघांवर 100 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ही कारवाई केली.

कार्यकारी अभियंता संजय खाबडे, उपअभियंता दिलीप धुमाळ आणि कनिष्ठ अभियंता वासुदेव अवसरे यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. महापालिकेच्या वायसीएमएच रुग्णालयातील पदव्युत्तर संस्थेच्या विविध कामांकरिता 16 मार्च 2019 रोजी चाणक्य हॉलमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. ‘ह’ क्षेत्रीय विद्युत कार्यालयाशी कर्तव्यांचे अनुषंगाने ऑपरेशन थिएटर नूतनीकरण कामकाज पूर्ण करण्यासंबंधी, इलेक्ट्रीकल व एसी डक्ट, ऑक्सीजन पाईपलाईन, बायोमेडीकल पाईपलाईन आणि फॉल सिलिंगचे काम करण्याच्या सूचना अभियंत्यांना दिल्या होत्या. काम पूर्ण करण्याकरिता 15 एप्रिल 2019 ची मुदत देण्यात आली होती. तथापि, निर्धारित वेळेत काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे अभियंता खाबडे, धुमाळ, अवसरे यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली होती.

वैद्यकीय व स्थापत्य विभागांनी त्यांच्यांशी संबंधित कामकाज मुदतीत पूर्ण केले नाही. त्यामुळे विद्युत विषयक कामकाज पूर्ण झाले नसल्याचा तिघांनीही नोटीसीचा खुलासा केला होता. ‘ह’ प्रभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी 5 जुलै 2019 रोजी त्याचा अहवाल सादर केला असून तीनही अभियंत्यांनी कामाकडे दुर्लक्ष आणि दिरंगाई केल्याचा ठपका ठेवला आहे.

अभियंता खाबडे, धुमाळ, अवसरे यांनी जाणून-बुजून पदव्युत्तर संस्थेच्या कामामध्ये दुर्लक्ष करणे, काम वेळेवर पूर्ण न करणे, कामामध्ये बेजबाबदारपणा व दिरंगाई केली आहे. त्यानुसार त्यांच्यावर 100 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दंडाची रक्कम त्यांच्या मासिक वेतनातून वसूल केली जाणार आहे. यापुढे कामकाजामध्ये हलगर्जीपणा केल्यास जबर शास्तीची कारवाई करण्याची ताकीद दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.