Pimpri : स्थायी समितीच्या अध्यक्षपदी कोण अधिकृत की बंडखोर? फैसला उद्या, उत्सुकता शिगेला

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी उद्या (गुरुवारी)निवडणूक होणार आहे. भाजपने विलास मडिगेरी यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. तर, भाजपच्याच शीतल शिंदे यांनी बंडखोरी करत आव्हान दिले आहे. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्षपदी अधिकृत उमेदवार असलेले मडिगेरी की बंडखोर शिंदे यांची निवड होते. याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असून उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजप पक्षश्रेष्ठीने निष्ठावान आणि जुने कार्यकर्ते असलेले विलास मडिगेरी यांना उमेदवारी दिली आहे. परंतु, गतवर्षी स्थायी समिती सदस्यत्वाचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालेल्यांचे राजीनामे घेतले होते. यावेळी ते घेतले नाहीत. त्यामुळे इतरांवर अन्याय होईल, अशी भूमिका घेत नेत्यांनी उमेदवारी बदलण्यासाठी गुप्त बैठका घेऊन पक्षश्रेष्ठींवर आणलेला दबाव, नजरचुकीने मडिगेरी यांची उमेदवारी जाहीर झाल्याचा बंडखोर शीतल शिंदे यांचा दावा, दोन्ही आमदारांमधील वर्चस्ववादाची लढाई या पार्श्वभूमीवर होणा-या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीला महत्व प्राप्त झाले आहे.

पक्षपातळीवर ठरलेल्या उमेदवाराबात बदल होत नाही. आजपर्यंत कधीच अधिकृत उमेदवाराला माघार घ्यायला लावली नाही. बंडखोराला साथ दिल्यास आणि बंडखोर उमेदवार निवडून आल्यास पक्षाची नाचक्की होईल. त्यामुळे झालेल्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर उमेदवाराचे नाव जाहीर करण्यासाठी निरीक्षक पाठविला होता. तसाच उद्या निवडणुकी दरम्यान निरीक्षक पाठविण्याची दाट शक्यता आहे. मतदानासाठी पक्ष ‘व्हीप’ जारी केला जाईल. व्हीपचे उल्लंघन केल्यास मुंबई महापालिका अधिनियम कायद्यानुसार नगरसेवकपद रद्द होते.

भाजपच्या शीतल शिंदे यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून राष्ट्रवादीच्या गीता मंचरकर तर अनुमोदक म्हणून शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांची स्वाक्षरी आहे. राष्ट्रवादीचे मयूर कलाटे यांनी देखील उमेदवारी अर्ज भरला आहे. बंडखोरी केलेल्या शिंदे यांनी माघार घेतल्यास राष्ट्रवादी निवडणूक लढविणार की उमेदवारी अर्ज माघार घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

स्थायी समिती अध्यक्षपदासाठी उद्या (गुरुवारी) दुपारी बारा वाजता निवडणूक होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे हे कामकाज पाहणार आहेत. स्थायी समितीत दहा भाजप, चार राष्ट्रवादी काँग्रेस, एक शिवसेना आणि एक अपक्ष असे पक्षीय बलाबल आहे. अपक्ष सदस्य भाजपसोबत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.