Tathawade News: ‘मुंबई-बंगळुरु रस्त्यालगत 12 मीटर सर्व्हिस रस्त्यास मान्यता द्या’

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीमधील ताथवडे येथून जाणा-या मुंबई – बंगळुरु रस्त्यालगत 60 मीटर रस्त्याच्या दोन्ही बाजूने 12 मीटर सर्व्हिस रस्ता प्रस्तावित करण्याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता द्यावी. सांगवी ते किवळे बीआरटी मार्गावरील ताथवडे पुनावळे हद्दीपासून पुनावळे रावेत पुलापर्यंत आणि  रावेत गावठाणापासून किवळे हद्दीतील मुकाई चौकापर्यंत मंजुर विकास योजनेत असलेली 30 मीटर रस्ता रुंदी 45 मीटर करण्यासाठीच्या फेरबदलास मान्यता देण्याची मागणी शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे यांनी राज्य सरकारकडे केली.

याबाबत नगरविकास, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची राहुल कलाटे यांनी भेट घेतली. त्यांना मागणीचे निवेदन दिले. त्यावर शिंदे यांनी तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश विभागाच्या प्रधान सचिवांना दिले आहेत. शिवसेनेचे संपर्कप्रमुख सचिन अहिर यावेळी उपस्थित होते.

कलाटे यांनी निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीमधून  मुंबई – बंगळुरु बाह्यवळण महामार्ग जातो. महापालिकेच्या मंजुर विकास योजनेनुसार वाकड, पुनावळे, रावेत, किवळे या गावांमधील महापालिका हद्दीतील बाह्यवळण महामार्गालगत 12 मीटरचे दोन सर्व्हिस रस्ते प्रस्तावित आहेत. वाकड, पुनावळे, रावेत, किवळे या भागातील महामार्गालगतच्या 12 मीटर सर्व्हिस रस्त्याचे भूसंपादन करण्याची कार्यवाही महापालिकेने सुरु केलेली आहे. महापालिकेकडून महामार्गालगतचे वाकड ते किवळे 12 मीटर सर्व्हिस रस्ते विकसित करण्याचे नियोजन केले आहे.

तथापि, ताथवडे गावातील मंजूर विकास योजनेत पुणे प्रादेशिक विकास योजनेप्रमाणे मुंबई – बंगळुरु रस्त्यालगत 60 मीटर रस्त्याच्या दोन्ही बाजूने 12 मीटर सेवा रस्ता दर्शविलेला नाही. त्यामुळे भविष्यात वाकड, ताथवडे, पुनावळे गावांना जोडणारा 12 मीटर सर्व्हिस रस्ते ताथवडे गावातील मंजूर विकास योजनेत दर्शविला नसल्याने वाहतुकीस अडचण निर्माण होणार आहे. त्यासाठी मुंबई-बंगळुरु रस्त्यालगत 60 मीटर रस्त्याच्या दोन्ही बाजूने 12 मीटर सर्व्हिस रस्ता प्रस्तावित करण्याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता द्यावी.

त्याचबरोबर सांगवी ते किवळे बीआरटी मार्गावरील ताथवडे पुनावळे हद्दीपासून पुनावळे रावेत पुलापर्यंत आणि  रावेत गावठाणापासून किवळे हद्दीतील मुकाई चौकापर्यंत मंजुर विकास योजनेत असलेली 30 मीटर रस्ता रुंदी 45 मीटर करण्यासाठीची कार्यवाही पूर्ण करुन महापालिकेच्या 20 मे 2015 रोजीच्या सभेत त्याबाबतचा प्रस्ताव मंजुर केला.  राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्यानुसार विकास योजनेत फेरबदल करण्याची महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 37 अन्वये कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. फेरबदलाच्या प्रस्तावांतर्गत नागरिकांच्या हरकती, सूचना मागविल्या होत्या. महापालिका वेबसाईटवर प्रसिद्धीकरण करण्यात आले. विकास योजनेतील फेरबदलास मान्यता देण्याची मागणी कलाटे यांनी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.