Pune : पोलिसांच्या तावडीतून फरार आरोपीला 12 तासात पुन्हा अटक

पत्नीच्या खून प्रकरणी केली होती अटक 

एमपीसी न्यूज – पोलिसांच्या हातावर तुरी देत फरासखाना पोलीस ठाण्यासमोरून पलायन केलेल्या आरोपीला सिंहगड पोलिसांनी 12 तासात आरोपीला पुन्हा अटक केली. पत्नीचा खून प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. 

पत्नीचा खून केल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीनं फरासखाना पोलीस स्टेशन समोरून पलायन केल्याची घटना काल दुपारी घडली. राहुल उर्फ राजेश हांडाळ (वय-22, रा. अंकुश पॅलेस, न-हेगाव), असे आरोपीचे नाव आहे. 

आरोपी हा सिंहगड पोलिसांच्या ताब्यात होता. त्याला न्यायालयात हजर केले असता 1 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. दरम्यान, काल वैद्यकीय तपासणीनंतर त्याला फरासखाना पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये ठेवण्यासाठी सिंहगड पोलीस घेऊन जात असताना त्याने फरासखाना पोलीस स्टेशनसमोरून पलायन केले. त्यानंतर पोलिसांनी वेगाने शोध करीत त्याला कोंढवी धावडे परिसरातून ताब्यात घेऊन अटक केली. 

आरोपीने गुरुवारी (26 एप्रिल) पत्नी कोमल हिचा गळा आवळून खून केला होता. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपीने तिच्या नातेवाईकांना फोनवरून याची माहिती दिली आणि फरार झाला होता. दरम्यान, सिंहगड पोलिसांनी त्याला त्याच दिवशी अटक केली होती. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.