Pune : ‘दिवानखाना’ महाराष्ट्र टेस्ट ड्राईव्ह खाद्य महोत्सवात मिळणार महाराष्ट्रातील वैविध्यपूर्ण लज्जतदार खाद्यपदार्थांची मेजवानी

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राला एक समृद्ध अशी स्वादिष्ट खाद्यसंस्कृती आहे जिची जोपासना केली आहे घरोघरीच्या सुगरणींनी. नुसती जोपासनाच नाही केली तर ती वाढवली, फुलवली आणि तिच्यात भरीव भर घातली. जसं मालवणी म्हटलं की नारळाचा भरपूर वापर केलेले चिकन, मटण, नागपुरी म्हणजे सावजी अशी समीकरणे आपल्या मनात घट्ट रुजलेली आहेत. मात्र याशिवायही इतर अनेक चविष्ट खाद्यपदार्थ घरोघरच्या सुगरणी वर्षानुवर्ष बनवत आलेल्या आहेत परंतु त्यांना लोकाश्रय मिळत नाही. अशा प्रकारच्या काही वेगळ्या मांसाहारी पाककृती घेऊन आपल्यासाठी सज्ज आहे बालेवाडी येथे नव्याने सुरु झालेला ‘दिवानखाना’.  
 
बहु असोत सुंदर संपन्न की महा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र हा हे महाराष्ट्र गीत ऐकले की कोणत्याही महाराष्ट्रीय मनाची तार झंकारली जातेच. एक मे हा महाराष्ट्राचा स्थापना  दिन. महाराष्ट्रात प्रत्येक बारा कोसांवर जशी भाषा बदलते तसेच खाद्यसंस्कृतीत देखील फरक पडतो. विभागानुसार कोकणच्या तांबड्या मातीतील भरपूर खोब-याचे मालवणी मसाल्याचे पदार्थ, पश्चिम महाराष्ट्रात दूधदुभत्याची, भाजीपाल्याची रेलचेल असते त्यानुसार बनवलेले चमचमीत तर्रीदार पदार्थ, सोलापुरी पद्धतीचे झणझणीत पदार्थ, व-हाडी पद्धतीचे तेलाचा सढळ हस्ते वापर केलेले मसालेदार पदार्थ बालेवाडी येथे नव्यानेच सुरु झालेल्या खास महाराष्ट्रीयन ‘दिवानखाना’ या रेस्टॉरंटमध्ये आपल्याला उपलब्ध झाले आहेत. यानिमित्त खास महाराष्ट्रीय टेस्ट ड्राइव्ह म्हणजे महाराष्ट्रीय भोजनाची पर्वणीच ठरणार असलेल्या महोत्सवाचे आयोजन करण्यात असल्याची माहिती दिवानखानाचे शिवराज काळे यांनी दिली.  MH-1 to MH-50 या दिवानखाना या हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या खाद्यमहोत्सवामध्ये महाराष्ट्रातील सर्व शहरातील खाद्यपदार्थांची सफर घडवण्यात येणार आहे.  
 
या महोत्सवात २८ व २९ एप्रिल रोजी कोल्हापुरी थाळी उपलब्ध असणार आहे. यात कोल्हापूरचा प्रसिद्ध तांबडा,पांढरा रस्सा, लाल सुके चिकन, मटण, घरगुती रस्सा, खिम्याचा गोळी पुलाव, ज्वारी, बाजरी किंवा तांदळाची भाकरी आणि खास इंद्रायणी तांदळाचा सुवासिक भात आदी पदार्थांचा समावेश आहे. 
 
३० एप्रिल व १ मे रोजी सोलापुरी थाळीची चव आपल्याला घेता येईल. यात खास सोलापुरी हिरव्या मसाल्याचे सुके मटण, चिकन, अळणी सूप, घरगुती रस्सा, चिकन, मटण अचार म्हणजे लोणचे, खिमा उंडे सुके किंवा रश्श्यामधील, शेंगा चटणी, पुदिना, लाल मिरची, खडा मसाल्याचा पत्ती राईस आणि भाकरी आपल्यासाठी उपलब्ध आहेत.  
 
२ व ३ मे रोजी नागपुरी थाळीचा आस्वाद खवय्ये घेऊ शकतील. या थाळीत अळणी सूप, व-हाडी रस्सा, नागपुरी काळं सुकं चिकन, मटण, खास नागपुरी दही चिकन, मटण आणि बासमती राईस आपल्याला तृप्त करुन जाईल. 
 

४ व ५ मे रोजी कोकणी थाळीमधून कोकणची चव घेता येईल. खास कोकणी सोलकढी, मालवणी सुकं चिकन, मटण, अळणी सूप, मुंबईचे आद्य रहिवासी असलेल्या पाठारे प्रभूंच्या पद्धतीचे मटण, चिकन, खाडी चिकन, मटण आणि तांदळाच्या भाकरी, कोंबडी वडे आणि खवय्यांच्या फर्माइशीनुसार आंबोळी, इंद्रायणी तांदळाचा भात या पदार्थांचा या थाळीत समावेश आहे. 
 
या सर्व थाळ्यांमधील पदार्थांचा खूप विचारपूर्वक समावेश करण्यात आला आहे. यामागे शिवराज काळे आणि कोमल राऊत या दोघांनी खूप परिश्रम घेतलेले आहेत. पंचविशीतील या दोघांनी आपले रेस्टॉरंट सजवण्यासाठी देखील खूप विचार केलेला दिसतो. गणेशपट्टीसह सजलेला भव्य दरवाजा आपल्याला पूर्वीच्या वाड्यांची आठवण करुन देतो. सुबक हंड्या झुंबरे, तांब्यापितळेच्या वस्तू, खास बनवून घेतलेली बाहेरुन तांब्याच्या ठोक्यांचे कोटिंग असलेली आणि आत स्टेनलेस स्टीलची मोठी थाळी, त्यात या थाळीला साजेशा वाट्या आणि बाऊल पाहिल्यावरच महाराष्ट्रीय रांगडेपणाची झलक दिसते. या मोठ्या थाळीतील जेवण खाण्यासाठी खाद्यपदार्थांमध्ये देखील तितकेच वैविध्य हवे. हे वैविध्य मुळातच महाराष्ट्रातील खाद्यपदार्थांमध्ये आहेच. फक्त त्याची योग्य सांगड घालून ती लोकांसमोर मांडणे गरजेचे होते आणि ते काम शिवराज आणि कोमल यांनी विचारपूर्वक केले आहे हे या रेस्टॉरंटच्या प्रथम दर्शनातच जाणवते. 
 
या खाद्यमहोत्सवाशिवायही येथे इतर दिवशी खास चिकन थाळी, मटण थाळी आणि शाकाहारी जेवण देखील मिळते. मांसाहारी पदार्थांमध्ये देखील खाडी चिकन, पाठारे प्रभू पद्धतीचे चिकन, मटण, व-हाडी खर्डा चिकन, शहाळ्यातील कोंबडी, संगमेश्वरी चिकन आपली जिव्हा तृप्त करण्यासाठी सज्ज आहे. शाकाहारी पदार्थांमध्ये देखील महाराष्ट्राची खासियत असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण डिशेस येथे उपलब्ध आहेत. सांडगा भाजी, शेव भाजी, अख्खा मसूर, भरलं वांगे, मटकी उसळ, कोथिंबिर वडी, मासवडी, खानदेशी खिचडी, पावटा पुलाव, दही भेंडी यासारख्या रुचकर आणि चमचमीत डिशेस येथे आहेत. आणि हो भरपेट खाल्यानंतर थोडासा मिठा तो बनता ही है…ती ख्वाहिश पुरी करण्यासाठी गोड पदार्थदेखील आहेतच. खास तयार केलेल्या चिक्की आईस्क्रीमची येथे येऊन चव घेतलीच पाहिजे. क्रश केलेली चिक्की आईस्क्रीमच्या साथीने खाताना आइस्क्रीम आणि चिक्कीचा गोडवा तनामनात विरघळत जातो. याशिवाय गाजरहलवा, गुलाबजाम यांच्याशिवाय पूर्णालू हा पुरणाच्या उंड्यांचा गोड पदार्थ नक्कीच खाऊन पाहावा असाच आहे. 
 
रेस्टॉरंटच्या बाहेरचे भव्य पेंटींगदेखील तितकेच लक्षवेधक झाले आहे. महाराष्ट्राच्या कानाकोप-यातील महाराष्ट्रीय अस्मितेची झलक यात आहे. या पेंटींगमधील ललनांच्या दागिन्यांपासून ते कपड्यांपर्यंत अस्सल महाराष्ट्रीय टच दिसून येतो. दिवानखाना या नावावरचा झळकणारा शिरपेच लक्ष वेधून घेतो. मग येत्या महाराष्ट्र दिनाचे सेलिब्रेशन करण्यासाठी दिवानखान्यात जायलाच हवे आणि तेथील खास महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायलाच हवा. रामराम पाव्हणं, मग दिवानखान्यात याच आणि तृप्त होऊनच जा. 

पत्ता – दिवानखाना     
 

दिवानखाना S2/S3 पहिला मजला, एलाईट प्रिमिओ, दसरा चौकाजवळ, 

बालेवाडी हाय स्ट्रीट, लक्ष्मीनगर, बालेवाडी गाव, बालेवाडी, पुणे महाराष्ट्र 411045 

संपर्क 07020499656
https://goo.gl/maps/W42f8bQkCJU2

 

"d2"
"d3"

"d8"

 
"d4.1"
 
"d6"

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.