Kasarwadi : …… अन् तीस वर्षांनी परत मोठ्या विद्यार्थ्यांनी गजबजली कासारवाडीची माध्यमिक शाळा !

तीस वर्षांपूर्वीच्या माजी विद्यार्थ्यांनी कासारवाडीच्या शाळेत जागविल्या शालेय जीवनातील आठवणी

एमपीसी न्यूज- आजकाल सोशल मिडियाच्या वापरामुळे जग पुन्हा जवळ येऊ लागले आहे. जुने मित्रमैत्रिणी फेसबुक, व्हॉटस् अॅपच्या माध्यमातून पुन्हा भेटू शकतात. नव्हे त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो. अशाच प्रकारे तीस वर्षांपूर्वी दहावीच्या वर्गात एकत्र असलेले मित्रमैत्रिणी एकत्र आले आणि त्यांनी आपले शालेय जीवन परत एकदा अनुभवले.

बालपणीचा काळ सुखाचा या वाक्याप्रमाणे शालेय जीवनातील प्रत्येक क्षण आपण भरभरुन जगलेले असतो. त्यावेळच्या अनेक आठवणी आपण आजही मनाच्या कोप-यात जपून ठेवलेल्या असतात. मित्रमैत्रिणींसोबत मनमुराद व्यतीत केलेले ते क्षण आपल्याला आयुष्यभराची उभारी देत असतात. खरंतर त्यावेळी या गोष्टींची जाणीव नसते पण मोठे झाल्यानंतरच त्याची महती जास्त पटते. त्यावेळी ते सहजगत्या घडून गेलेले असते पण आता मागे वळून पाहताना त्यातील अवीट गोडी जाणवते आणि अचानक जर ते शालेय जीवन परत अनुभवायला मिळाले तर किती छान होईल अशी हूरहूर वाटू लागते. पूर्वी शाळा जुन्या पुराण्या मोडकळीला आलेल्या असत. पण त्यात उच्चप्रतीचे जीवन शिक्षण मिळत असे. या शाळांमधून शिकून मोठे झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते. मात्र आजकालच्या शाळा चकचकीत असतात आणि विद्यार्थ्यांना त्यात किती मूल्ये मिळतात हा संशोधनाचा विषय होईल.

कासारवाडी येथील माध्यमिक विद्यालयातील सन 87-88 ला दहावी उत्तीर्ण झालेले सुमारे शंभर विद्यार्थी व विद्यार्थिनी तीस वर्षांनंतर परत एकत्र भेटले होते. आज त्यातील अनेकजण वेगवेगळ्या क्षेत्रात नामवंत झाले आहेत. डॉक्टर, इंजिनिअर, पत्रकारिता, उद्योग, व्यवसाय, कामगार, अधिकारी, शैक्षणिक क्षेत्रातील नामवंत बनले आहेत. परंतु शाळा हा प्रत्येकाच्या हृदयातील एक हळवा कोपरा असतो. आणि शाळेतील मित्र हा त्या आठवणींमधला एक नाजूक दुवा असतो. तीस वर्षांनंतर परत भेटताना काही जणांना लगेच ओळखता आले तर काही जणांची ओळख पटवून घ्यायला थोडा वेळ लागला. मात्र या कार्यक्रमासाठी अनेक जण लांबून आले होते.

विशेषत मुले येऊ शकतात पण मुली ज्या आता जबाबदार माता, पत्नी बनलेल्या असतात त्यांना संसाराच्या व्यापातून वेळ काढण्यासाठी थोडीशी कसरत करावी लागलेली असते. पण मित्रमैत्रिणींच्या भेटाची ओढ त्यांना ही सवड काढण्यासाठी भाग पाडते आणि थोड्याश्या प्रौढ झालेल्या या विद्यार्थिनी परत एकदा शाळकरी बनून शाळेत जुन्या ओढीनेच जमल्या होत्या. शाळेत असताना केलेल्या गमती-जमती, एकत्र बसून केलेला अभ्यास, सहल, स्नेहसंमेलन या सगळ्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला.

शैलेन्द्र सांडभोर, कुंदा मते, वैशाली जवळकर, डॉ. रेखा सुपेकर, अनिल कातळे, राहुल धनकुडे, रमेश कोळी, लतीफ सय्यद, बाळासाहेब शिवशरण, दीपक माळी, नवीन बोराडे, शिवकुमार नायर, वैशाली दहिवळ, अनिता गोरडे, वैशाली देवकर, आशा लांडे याच्यासह इतर अनेकांनी आपल्या सहाध्यायींना भेटण्यासाठी एकत्र आणण्यासाठी परिश्रम घेतले. तीस वर्षांपूर्वीचा शालेय काळ परत एकदा अनुभवून टवटवीत झालेले हे सर्वजण परत भेटीची ओढ घेऊनच आपापल्या घरी परतले हे मात्र नक्की.

"Kasarvadi

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.