Pune : जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशनच्या एज्युकॉन प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांसाठी वीस लाखांची देणगी

एमपीसी न्यूज- जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशन महाराष्ट्र रिजन यांच्या वतीने चालवण्यात येणा-या एज्युकॉन या शैक्षणिक प्रकल्पाची वार्षिक सभा रविवार, 24 जून रोजी झाली. यावेळी लाभार्थी विद्यार्थ्यांसाठी सुमारे वीस लाखांच्या आर्थिक देणग्या देण्यात आल्या.

जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशनच्या महाराष्ट्र रिजनच्या वतीने एज्युकॉन हा वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प राबवण्यात येतो. 2012 सालापासून सुरु झालेल्या या प्रकल्पामार्फत जैन व इतर समाजातील हुशार व गरजू विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदतीच्या स्वरुपात शिष्यवृत्ती देण्यात येते. आजवर अशा पद्धतीने 337 विद्यार्थ्यांना सुमारे एक कोटी चार लाख रुपये शिष्यवृत्तीच्या स्वरुपात देण्यात आले असून या सर्व व्यवहारात पूर्णत: पारदर्शकता असते.

यावेळी इशिता पारेख या विद्यार्थिनीची आई वंदना पारेख यांना नीलया मोस्ट इन्स्पायरिंग पालक पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच श्रृतिका ओसवाल आणि सुयोग शहा यांना नीलया फाउंडेशन विशेष पुरस्कार देण्यात आला. शामल कर्नावट हिला सार्थक बेस्ट स्टुडंट पुरस्कार देण्यात आला. याशिवाय या एज्युकॉन प्रकल्पातून शिष्यवृत्ती मिळवून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करुन डॉक्टर झालेल्या डॉ. अक्षय चिपरे यांना देखील सार्थक बेस्ट स्टुडंट पुरस्कार प्रदान करण्यात आला.

स्वागत महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष मांगीलाल कोठारी यांनी केले. प्रास्तविक एज्युकॉन प्रकल्पाचे अध्यक्ष कामेश शहा यांनी केले. प्रकल्प अहवाल सचिव दीपक डागा व खजिनदार सुनील शहा यांनी सादर केला. यावेळी जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशनचे माजी अध्यक्ष शरद शहा, उपाध्यक्ष सतीश बाफना, सचिव बीरेन शहा, लालचंद जैन, विशेष उपस्थित होते. या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एज्युकॉन प्रकल्पाचे विद्यार्थी शामल कर्नावट व अथर्व गायकवाड यांनी केले. आभार दिलीप चोरबोले यांनी मानले. यावेळी रोहित लालवानी आणि विश्वजीत काशिद यांची प्रोत्साहनात्मक भाषणे देखील झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.