Pune : युवा गायिका प्रीती ताम्हनकर हिच्या आश्वासक गायनाने रसिक मंत्रमुग्ध

एमपीसी न्यूज- पहिल्या पावसामुळे आलेला हवेतील सुखद गारवा, सकाळची प्रफुल्ल वेळ, हॉलची रंगतदार सजावट, मैफल सजवणारी कलाकार वयाने विशीतील त्यामुळे तिच्या गायनाबद्दल रसिकांमध्ये असणारे कुतूहल आणि उपस्थित मोजके पण दर्दी रसिक या सर्व माहोलामध्ये अमेरिकेत राहूनही आपले गाणे जपणारी युवा कलाकार प्रीती ताम्हनकर हिने सादर केलेल्या आश्वासक गायनामुळे रसिक नक्कीच मंत्रमुग्ध झाले.

वारजे माळवाडी येथील ओव्हलनेस्ट या खाजगी गृहसंकुलामध्ये झालेल्या एका छोटेखानी मैफिलीमध्ये अमेरिकेतील प्रीती ताम्हनकर या युवा गायिकेच्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. पं. विजय कोपरकर यांची शिष्या आणि दिवंगत ज्येष्ठ गायिका वीणा सहस्त्रबुद्धे यांची तालीम मिळण्याचे भाग्य लाभलेली ही युवा गायिका अवघी विशीतील आहे. तिने या मैफिलीची सुरुवात राग भटियारने केली. सजन बिना रि माई कौन सुने दुख की बतिया या विलंबित बंदिशीत तिने अतिशय सुंदर व आवश्यक तिथे आलापी सादर करुन या युवा वयातही स्वरांवरील उत्तम पकड दर्शवून दिली. छोटे छोटे आलाप, उत्तम तानक्रिया यामुळे सजलेले तिचे आश्वासक गायन रसिकांना मंत्रमुग्ध करुन गेले. उचट गयी मोरी नींद या द्रुत बंदिशीने तिने रागाची उत्तम मांडणी आणि डोळस गायनाचा प्रत्यय घडवला.

त्यानंतर तेजोनिधी लोहगोल ही कट्यार काळजात घुसली या नाटकातील रचना त्यातील आवश्यक तेवढ्या जोरकसपणे सादर केली. त्यानंतर विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म हा अभंग सादर केला. प्रीतीला या मैफिलीत संवादिनी साथ तिचे वडील मनोज ताम्हनकर यांनी केली. तबलासाथ श्रीकांत भावे यांनी व गायनसाथ प्रीतीची बहीण शर्वरी ताम्हनकर हिने केली.

सध्या बारावी पूर्ण केलेल्या प्रीतीला नृत्याची देखील तेवढीच आवड आहे. मात्र सध्या तिने गायनाकडेच जास्त लक्ष देण्याचे ठरवले आहे. अमेरिकेत राहून शास्त्रीय गायन व नृत्य या कला जोपासणे तसे अवघड आहे. पण आई वडिलांच्या समर्थ पाठबळाच्या जोरावर ही उद्याची उदयोन्मुख गायिका आपली कला आश्वासकपणे जोपासते आहे.

या मैफिलीसाठी ज्येष्ठ गायक पं. हेमंत पेंडसे, मिलींद गुरव, गायक जितेंद्र अभ्यंकर विशेष उपस्थित होते. संयोजन दिनेश जोशी, सायली जोशी व ओव्हलनेस्ट या गृहसंकुलातील सदस्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.