Dehugaon : संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी पोलिसांची कडेकोट सुरक्षा

एमपीसी न्यूज – जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी पोलिसही सज्ज झाले आहे. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. त्यामुळे या सोहळ्यासाठी पोलिसही सज्ज झाले आहेत. 

यंदा पालखी बंदोबस्तासाठी 7 पोलीस निरीक्षक, 19 सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपपोलीस निरीक्षक, 200 पुरूष पोलीस कर्मचारी, 75 महिला पोलीस कर्मचारी, 70 वहातूक पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे 200 पुरूष व महिला कर्मचारी, राज्यराखीव दलाच्या 2 तुकड्यातील 51 पोलीस कर्मचारी, 1 अतिशिघ्र कृतीदलाचे 18 कर्मचारी, डॉगस्कॉड व बॉम्ब नाशक पथक, 170 स्वयंसेवक व पोलीस मित्र बंदोबस्तासाठी असणार आहेत.  

मंदिराच्या सुरक्षिततेसाठी 32 छुपे कॅमेरे सज्ज असून संपूर्ण मंदिर परिसरावर या छुप्या कॅमेऱ्यांची नजर आहे. आज सायंकाळी बॉम्ब शोध व नाशक दलाच्या श्वान पथकाने मंदिर परिसराची तपासणी केली. पोलीस व संस्थानच्या वतीने भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रवेशद्वारत धातूशोधक यंत्र, सीसीटीव्ही कॅमेरे, दर्शनबारी, भाविकांना आत येण्याचा मार्ग व बाहेर जाण्याचा मार्ग, अति महत्त्वाच्या व्यक्तीची व्यवस्था, प्रदक्षिणा मार्ग, पालखीच्या पहिल्या मुक्कामाच्या ठिकाणी चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. 

अनगडशहा दर्ग्याजवळ देखील भाविकांची गैरसोय व गर्दीही होणार नाही या दृष्टीने पोलिसांनी व्यवस्था केली आहे. याठिकाणी प्रथम लोखंडी अडथळे लावले आहेत. या पहिल्या पालखीच्या विसाव्या स्थानावर सूरक्षिततेच्या कारणास्तव मोजक्याच लोकांना सोडण्यात येणार आहे. यासाठी आज पोलिसांनी लोखंडी अडथळे बॅरेगेटिंग लावण्यात आले आहेत. साध्या वेशातील पोलीस मित्र व पोलीस कर्मचारी इंद्रायणी नदीच्या काठावर गस्त घालीत असून नदीकाठी पोहता येणारे गृहरक्षक दलाचे कर्मचारी नेमण्यात आले आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने लाईफ जॅकेट उपलब्ध करून दिले असून जीवरक्षकांची ही नेमणूक केली आहे.

ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर उभे केले आहेत. भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक्तेनुसार तात्पुरत्या शौचालयांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, भाविकांना चालताना पदपथाचा वापर करता येत नाही म्हणून गावातील पदपथावरील अतिक्रमणे काढून टाकली आहे. परंतू त्याच ठिकाणी ही शौचालये लावण्यात आल्याने या पदपथाचा उपयोग खरच भाविकांसाठी होत आहे का असा प्रश्न येथील ग्रामस्थ व अतिक्रमण काढलेले विक्रेते करीत आहेत. हलका पाऊस पडत असल्याने भाविकांसाठी गावातील धर्मशाळा, कार्यालये आणि विद्यालयांतील खोल्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.