Pimpri: डाक सेवकांच्या संपामुळे टपाल सेवा ठप्प 

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक कर्मचारी संघटना तसेच नॅशनल युनियन ऑफ ग्रामीण डाक सेवक या राष्ट्रीय संघटनांच्या नेतृत्वाखाली मंगळवारपासून देशातील दोन लाख सत्तर हजार टपाल कर्मचारी विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर गेले आहेत. त्यात पिंपरी-चिंचवडमधील टपाल कर्मचारी देखील सहभागी झाल्याने टपाल सेवा ठप्प झाली आहे. 

चिंचवडगाव, चिंचवड स्टेशन, पिंपरी कॉलनी, पिंपरी (खराळवाडी), थेरगाव, वाकड, हिंजवडी, भोसरी, भोसरी एमआयडीसी, औंध, सांगवी, प्राधिकरण, आकुर्डी, रुपीनगर, दापोडी, खडकी, देहूरोड, देहूगाव येथील ग्रामीण डाक सेवक कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. नॅशनल युनियन ऑफ ग्रामीण डाक सेवक पुणे विभागाचे सचिव राजू करपे यांच्या नेतृत्वाखाली चिंचवड स्टेशन येथील टपाल कार्यालयासमोर टपाल खात्याविरुध्द धरणे आंदोलन करण्यात आले.

याबाबत करपे म्हणाले की, टपाल कर्मचा-यांनी मे 2018 मध्ये सलग सोळा दिवसांचा संप केला होता. त्यावेळी केंद्र सरकारने कर्मचा-यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच कमलेश चंद्रा कमिटीच्या शिफारशी लागू करण्याचेही आश्वासन दिले होते. परंतु, सरकारला मागील सहा महिन्यात दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे. कमलेश चंद्रा कमिटीने शिफारस केल्याप्रमाणे बारा, चोविस, छत्तीस वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना शिफारशी प्रमाणे वेतनवाढ द्यावी. पाच लाख रुपये ग्रॅज्युएटी द्यावी. पेंशन फंड टीआरसीएच्या दहा टक्के कपात करावी.

तीस दिवसांची रजा व एकशे ऐंशी दिवसांची संचयीत रजा मंजूर करावी. एक माणसी डाक घरात दोन कर्मचा-यांची नियुक्ती करावी. सर्व कर्मचा-यांना नियमित कर्मचा-यांचा दर्जा देण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.