Chinchwad : दृष्यम स्टाईलने खून करून पुरावा नष्ट करणाऱ्या मुख्य सूत्रधाराला अटक

एमपीसी न्यूज – भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी तरुणाचा खून करून आणखी दोघांचा खून करण्याच्या तयारीत असलेल्या राहुल पवार या गुन्हेगारास पिंपरी- चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने अटक केली. राहुल पवार याने आपल्या साथीदारांसोबत मिळून एका तरुणाचे अपहरण करून त्याचा खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह गुजरात मधील वापी जिल्ह्यात नेऊन जाळला. राहुल पवार हा आणखी दोन ते तीन जणांचा खून करण्याच्या तयारीत असतानाच त्याला बेड्या(Chinchwad) ठोकण्यात आल्या.

 

राहुल संजय पवार (वय 34, रा. म्हाळूंगे इगळे, ता. खेड) असे अटक आरोपीचे नाव आहे. खेड तालुक्यातील रासे फाटा येथील मराठा हॉटेलमध्ये हॉटेल मालक स्वप्नील उर्फ सोप्या संजय शिंदे याच्यावर हॉटेलमध्ये घुसून 18 मार्च रोजी काही जणांनी गोळीबार केला. त्यात स्वप्नील शिंदे जखमी झाले. या प्रकरणी राहुल संजय पवार (रा. म्हाळुंगे इंगळे, ता. खेड) अजय गायकवाड आणि एका अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी अजय गायकवाड याला अटक केली. त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दुसरा आरोपी अमर नामदेव शिंदे (वय 25, रा. कासार आंबोली, ता. मुळशी) याला 23 मार्च रोजी अटक(Chinchwad) केली.

 

पोलीसांनी अमरची कसून चौकशी केली असता गोळीबाराच्या घटनेच्या दोन दिवस आधी म्हणजेच 16 मार्च रोजी राहुल पवार याने साथीदारांच्या मदतीने आदित्य युवराज भांगरे (वय 18, रा. भांगरे वस्ती, म्हाळुंगे, ता. खेड) याचा खून केल्याची माहिती त्याने दिली. राहुल पवार याचा भाऊ रितेश पवार याचा खून झाल्यानंतर त्याचे खुनाचे छिन्नविच्छिन्न फोटो आदित्य याने सोशल मिडीयावर स्टेट्सला ठेवले होते. त्याचा राग राहुल पवार याच्या डोक्यात होता.त्यावरून राहुल पवार याने दोन साथीदारांसोबत मिळून 16 मार्च रोजी आदित्य याचे कार मधून अपहरण केले. वायरने गळा आवळून त्याचा कारमध्येच खून केला. आदित्य याचा खून केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी ‘दृश्यम’ चित्रपट स्टाईलने पोलिसांची दिशाभूल केली.

खेड तालुक्यातील निमगाव येथे लाकडे पेटवून तिथे आदित्य याचा मृतदेह जाळला असल्याचा बनाव केला. तसेच,आदित्यचा मोबाईल गोवा येथे एका आरोपीसोबत पाठवला. त्यामुळे तांत्रिक विश्लेषणात आदित्य गोवा येथे असल्याचे दिसत होते. मात्र, पोलिसांनी आदित्यचे जेथून अपहरण झाले तेथील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून आरोपींचा माग काढला. आरोपींनी आदित्य भांगरे याचा गाडीत खून केल्यानंतर त्याचा मृतदेह महाराष्ट्र-गुजरात सीमेवर असलेल्या वेलवाडा गुजरात येथे जंगल परिसरात जाळला होता. पोलिसांनी वेलवाडा येथून अर्धवट जळालेला मृतदेह ताब्यात घेतला.

Bhosari : तडीपार गुंडाला भोसरीतून शस्त्रासह अटक

राहुल पवार टोळीवर मोका

टोळी प्रमुख राहुल संजय पवार (रा. महाळुंगे इंगळे, ता. खेड), अमर नामदेव शिंदे (वय 28, रा. कासार आंबोली, ता. मुळशी), नितीन पोपट तांबे (वय 34, रा. मोशी), अभिजित उर्फ अभी चिंतामण मराठे (रा. जय भवानी नगर, कोथरूड), आसिफ उर्फ आशु हैदर हाफशी (रा. कासारवाडी) या टोळीवर मोका लावण्यात आला आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्याचा तपास करताना आरोपींनी संघटीतपणे सात गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. आरोपींनी महाळुंगे एमआयडीसी, चाकण, एमआयडीसी भोसरी, सांगवी, पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, खंडणीसाठी अपहरण, जबरी चोरी, बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल आहेत.

 

आणखी दोन-तीन खून करण्याचा डाव

मुख्य आरोपी राहुल पवार याच्यासह टोळीवर पोलीसांनी ‘मोक्का’अंतर्गत कारवाईही केली. मात्र, या गुन्ह्यातील मुख्य आरोपी राहुल पवार पसारच होता. पोलीसांना गुंगारा देण्यासाठी त्याने टक्कल करून दाढी-मिशीही काढली होती. त्यामुळे त्याचा शोध घेणे कठीण झाले होते. त्याच्या संपर्कातील 67 लोकांकडे चौकशी करण्यात आली. तो वावरत असलेल्या नाशिक फाटा भागातील दुकाने, मेट्रो स्टेशन येथील 124 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. 22 एप्रिल रोजी गुंडा विरोधी पथकाला राहुल हा औंध येथे येणार असल्याची माहिती मिळाली. पोलीसांनी सापळा रचून रिक्षातून आलेल्या राहुलला ताब्यात घेतले. मात्र, पेहराव बदलेल्या राहुलने आपे नाव सागर संजय मोरे असे सांगितले. पोलीसी खाक्या दाखवताच त्याने आपण राहुल असल्याची कबुली दिली. चौकशीत त्याने आपण भावाच्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना मदत करणार्‍या आणखी दोन ते तीन जणांचा खून करण्याच्या तयारीत होतो, अशी धक्कादायक माहिती दिली. गुंडा विरोधी पथकाने वेळीच जेरबंद केल्याने त्याचा डाव उधळला.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हरिष माने, फौजदार अशोक जगताप, हजरत पठाण, प्रविण तापकीर, सोपान ठोकळ, विक्रम जगदळे, गंगाराम चव्हाण, गणेश मेदगे, विजय गंभीरे, सुनील चौधरी, मयुर दळवी, नितीन गेंगजे, शाम बाबा, विजय तेलेवार, शुभम कदम, रामदास मोहिते, ज्ञानेश्वर गिरी, तौसिफ शेख, नागेश माळी, पोपट हुलगे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.