Pune : कलापिनी कोमकली यांच्या सादरीकरणातून पंडित कुमार गंधर्व यांच्या गायकीचे दर्शन

एमपीसी न्यूज – मेवाती घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पंडित संजीव (Pune) अभ्यंकर याचे सुरेल गायन… ग्वाल्हेर घराण्याच्या प्रसिद्ध गायिका कलापिनी  कोमकली यांच्या गायनातून पंडित कुमार गंधर्व यांच्या गायकीची आठवण अन्‌‍ घडलेले दर्शन तर किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित विनायक तोरवी यांच्या दमदार गायनाने गाठलेला कळसाध्याय अशा मनोहारी मैफलीचे रसिक  साक्षीदार ठरले.निमित्त होते युगप्रवर्तक, विख्यात हिंदुस्तानी शास्त्रीय गायक पद्मविभूषण पंडित कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दीनिमित्त देवासस्थित (मध्यप्रदेश) कुमार गंधर्व प्रतिष्ठानतर्फे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या ‌‘कालजयी’ कार्यक्रमाचे. पंडित तोरवी यांच्या मैफलीने दोन दिवसीय कार्यक्रमाची रविवारी (दि. 11) सांगता झाली.

कार्यक्रमाची सुरुवात पंडित संजीव अभ्यंकर यांनी मियाँ की तोडी रागातील ‌‘सजन तुम प्यारे’ या बंदिशीने करून रसिकांना अनोख्या भावविश्वात नेले. द्रुत लयीतील ‌‘मानेना मोरा जियारा कैसे बिताऊ दिन-रतीया’ या रचनेतून विरहणीची भावव्याकुळता रसिकांपर्यंत पोहोचविली. पंडित अभ्यंकर यांनी कुमारजी यांच्या आठवणींना उजाळा देत राग चारुकेशीमधील ‌‘आस लगे पिया आवन की मनभावन की’ ही बंदिश सादर केली. द्रुत लयीतील ‌‘आखिन मे बसे, जिया मे बसे’ या रचनेला रसिकांची भरभरून दाद मिळाली. पंडित अभ्यंकर यांना रोहित मुजुमदार (तबला), अभिनय रवांदे (संवादिनी), साईप्रसाद पांचाळ, नीलिमा पाताळ (सहगायन), मुक्ता जोशी (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात पंडित कुमार गंधर्व यांच्या कन्या व शिष्या प्रसिद्ध गायिका कलापिनी कोमकली यांचे बहारदार गायन झाले. कलापिनी कोमकली यांनी मैफलीची सुरुवात करताच रसिकांच्या मनात कुमारजींच्या आठवणी दाटून आल्या. कुमारजींनी रचलेल्या राग सहेली तोडीतील ‌‘काहे रे जगावा’ या बंदिशीने त्यांनी मैफलीची सुरुवात केली. त्यानंतर ‌‘चंदा सा मुख बनडारा’  सुमधूर बंदिश सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

Pune : महाराष्ट्राच्या लोकनृत्यांनी परदेशी पाहुण्यांना दिला निखळ आनंद

त्यानंतर कोमकली यांनी शुक्ल बिलावलमधील अतिशय जुनी-दुर्मिळ बंदिश ऐकवली, ज्याचे शब्द होते ‌‘कल ना परत मोहे’. यानंतर सादर केलेल्या तराण्याविषयी आठवण सांगताना कोमकली म्हणाल्या, ही बंदिश माझे वडील कुमारजी गात असत; परंतु हा तराणा ते गात नसत. हा तराणा माझ्या आईने म्हणजे वसुंधरा कोमकली यांनी मला शिकविला आहे. पिलू रागातील ‌‘लाग रही एरी सावन की झरी’ हे स्वर ऐकवून कोमकली यांनी मैफलीची सांगता लोकसंगीतातील भजनाने केली. त्यांना प्रशांत पांडव (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी), वैदेही व्यास, सावनी गोगटे (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

गायन सत्राचा समारोप किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित विनायक तोरवी यांच्या मैफलीने झाला. जौनपुरी रागातील विलंबित एकतालातील ‌‘बाजे झनन’ या बंदिशीनंतर द्रुत तीन तालातील ‌‘कान भनकवा’ ही रचना सादर केली. पटदीप रागातील मध्यलयीतील ‌‘पिया नही आए’, द्रुत तीन तालात ‌‘देहरीमो दरबार’ सादर करून पावसाला साद घालत सूर मल्हार रागातील मध्यलयीतील तीन तालातील ‌‘गरजत आए कारे बादल’ ही बंदिश सादर केली. त्यानंतर ‌‘बदरवा बरसन’ ही रचना ऐकवली. मैफलीचा समारोप भैरवीने करताना पंडित तोरवी यांनी संत तुकाराम महाराज यांचा ‌‘देव माझा मी देवाचा’ हा मराठी अभंग सादर करून रसिकांना विठ्ठल नामात चिंब केले. पंडित तोरवी यांना प्रशांत पांडव (तबला), डॉ. अरविंद थत्ते (संवादिनी), धनंजय हेगडे, सिद्धार्थ बेलमण्णू (तानपुरा, सहगायन) साथसंगत केली.

कलाकारांचा सन्मान माजी न्यायाधीश मुकुल मुद्गल, डॉ. अरविंद थत्ते, भुवनेश कोमकली आणि पंडित मधुप मुद्गल यांच्या हस्ते करण्यात आला. आभार भुवनेश कोमकली यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी (Pune) यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.