Pune Crime News : UAE दिरहम म्हणून दिला कपडे धुण्याचा साबण, 28 वर्षीय तरूणाची फसवणूक

एमपीसी न्यूज – कमी किमतीच्या भारतीय चलनाच्या बदल्यात संयुक्त अरब अमिरात (UAE) देशाचे चलन दिरहम विकत घेण्याचा मोह एका तरूणाला चांगलेच महागात पडले आहे. आंबेगाव येथील 28 वर्षीय तरूणाला UAE दिरहम म्हणून चक्क कपडे धुण्याचा साबण देत त्याची 2 लाख रूपयांची फसवणूक केली आहे. अपर कोंढवा येथे गुरूवारी (दि.16) रात्री साडे सातच्या सुमारास हा प्रकार घडला.

याप्रकरणी आंबेगाव येथील 28 वर्षीय तरूणाने रविवारी (दि.19) बिबवेवाडी येथे फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार दोन अज्ञात इसमांविरोधात भारतीय दंड विधान कलम 406, 420, 392, 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी तरूणाला कमी पैशात UAE दिरहम देण्याचे आमिष दाखवले. फिर्यादी तरूण पैसे घेऊन अपर कोंढवा येथे पोहचला. आरोपी याठिकाणी आले व त्यांनी एक नायलॉनची पिशवी फिर्यादी यांच्या हातात दिली. फिर्यादी पिशवी उघडून बघत असताना, त्यांच्या हातातून 2 लाख 1 हजार रूपये असलेली पिशवी हिसकावून पळून गेले.

फिर्यादी यांनी पिशवी उघडून पाहिली असता त्यात कपडे धुण्याच्या साबणाला वर्तमानपत्र गुंडाळून रूमालाने बांधलेला गठ्ठा व त्याखाली जिन्स पॅन्टचा तुकडा सापडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तरूणाने पोलिसांत धाव घेतली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.