Pune News : वैद्यकीय यंत्रणा सक्षम करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार; चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

एमपीसी न्यूज – कोरोना काळात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याची गरज प्रकर्षाने जाणवली. त्यामुळे आगामी काळात वैद्यकीय यंत्रणा सक्षम करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार, अशी ग्वाही भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली.

राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त प्रभाग क्रमांक 9 मधील डॉक्टरांचा सन्मान  चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, स्थानिक नगरसेविका स्वप्नाली सायकर, ज्योती कळमकर, पुणे शहर भाजपा उपाध्यक्ष गणेश कळमकर, शहर सरचिटणीस दीपक पोटे, प्रल्हाद सायकर, सहकार आघाडी प्रभारी प्रकाश तात्या बालवडकर, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनित जोशी, डॉ. राजेश देशपांडे, बाणेर-बालेवाडी डॉक्टर असोसिएशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, कोरोना काळात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याची गरज प्रकर्षाने जाणवली. त्यामुळे अनेकांनी ही गरज पूर्ण करण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न केले. मात्र, आता आगामी काळात वैद्यकीय यंत्रणा सक्षम करण्याची गरज आहे. त्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी सेवाभावी वृत्तीने किमान 50 बेड्सचे हॉस्पिटल कार्यान्वित केले पाहिजे. डॉक्टरांनी यासाठी एखादा प्रस्ताव दिला, तर त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

ते पुढे म्हणाले की, कोविडमध्ये डॉक्टरांनी प्रचंड मेहनत घेतली‌. अनेक डॉक्टर महिनोन्महिने आपल्या कुटुंबापासून दूर राहून सेवा दिली. त्यामुळे त्यांचा सन्मान ही आपली जबाबदारी आहे, असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.

यावेळी स्थानिक नगरसेविका स्वप्नाली सायकर आणि ज्योती कळमकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे शहर भाजप उपाध्यक्ष गणेश कळमकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रल्हाद सायकर यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.