Pune : पंडित रघुनंदन पणशीकर यांच्या घराणेदार गायनाने 10 व्या गानसरस्वती महोत्सवाचा समारोप

एमपीसी न्यूज – गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे ज्येष्ठ शिष्य पंडित रघुनंदन पणशीकर ( Pune ) यांच्या घराणेदार गायकीने 10 व्या गानसरस्वती महोत्सवाचा आज समारोप झाला.गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या भारतीय शास्त्रीय संगीतातील अलौकिक योगदानाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. ज्येष्ठ रंगकर्मी नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांच्या प्रयत्नांतून स्थापन झालेल्या नाट्यसंपदा प्रतिष्ठानच्या वतीने यावर्षी दहावा गानसरस्वती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्स येथे सुरु असलेल्या या महोत्सवाला आज नाट्यसंपदा प्रतिष्ठानचे विश्वस्त व सुप्रसिद्ध गायक पं रघुनंदन पणशीकर, अपर्णा पणशीकर, गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे सुपुत्र बिभास आमोणकर, निहार आमोणकर, धवल किर्लोस्कर, मृगा किर्लोस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.

 

महोत्सवाच्या चौथ्या दिवसाची सुरुवात डॉ शंतनु गोखले यांच्या संतूरवादनाने झाली. यावेळी त्यांनी राग हंसध्वनी सादर करीत दमदार सादरीकरण केले. सुरुवातीला पारंपरिक आलाप, जोड, झाला यांची प्रस्तुती त्यांनी केली. यानंतर झपताल आणि तीन तालातील रचना सादर करीत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. डॉ शंतनु गोखले यांना पं रामदास पळसुले यांनी समर्थ तबलासाथ केली.

 

यानंतर पंडिता रोहिणी भाटे यांची शिष्या असलेल्या शर्वरी जमेनीस यांनी आपल्या कथकनृत्य प्रस्तुतीने उपस्थितांना खिळवून ठेवले. यावेळी जमेनीस म्हणाल्या, “काही महोत्सवांची नावे उच्चारताना आम्हा कलाकारांना आदरयुक्त भीती वाटते, गानसरस्वती महोत्सव हे त्यातलेच एक नाव आहे. या व्यासपीठाला साजेशी कलाकृती आपल्याकडून घडेल का याचा विचार कायम असतो.”

शर्वरी जमेनीस यांनी नृत्यवंदना सादर करीत आपल्या सादरीकरणाला सुरूवात केली. या प्रस्तुतीत नृत्यासाठी आवश्यक असलेल्या स्थळ, काळ, ऊर्जा, स्वर, लय, वाद्यवृंद, नुपूर आदी घटकांना आणि नृत्यगुरू नटराज यांना वंदना करण्यात आले. यासाठी डॉ चैतन्य कुंटे यांनी संगीत दिले असून स्वतः शर्वरी जमेनीस यांनी साहित्य रचना केली आहे.यानंतर त्यांनी सोळा मात्रांच्या तीनतालचे बहारदार सादरीकरण केले. त्यांनी सादर केलेल्या आमद, परण आमद, तिहाई अशा नृत्यातील बारकाव्यांना उपस्थितांनी दाद दिली. यानंतर त्यांनी काली मातेचे वंदन करणारे काली परण सादर केले. सोळा मात्रांचा तीनताल सोळा चक्कर आणि पारंपरिक बंदिश यांचे सादरीकरण देखील त्यांनी केले.

 

सदर वर्ष हे पंडिता रोहिणी भाटे यांचे जन्मशताब्दी वर्ष असून यानिमित्ताने त्यांना आदरांजली वाहण्याच्या उद्देशाने शर्वरी जमेनीस यांनी रोहिणी ताई यांनी रचलेले काही तुकडे उपस्थितांसमोर सादर केले. विठ्ठल रखुमाई वर आधारित जमेनीस यांनी स्वतः रचलेल्या मराठी कवितेला उपस्थितांनी मनसोक्त दाद दिली. शर्वरी जमेनीस यांना निखिल फाटक (तबला), यशवंत थिट्टे (संवादिनी), विनय रामदासन (गायन), धवल जोशी (बासरी) आणि वैष्णवी देशपांडे (पढंत) यांनी साथसंगत केली.  मिलींद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

यानंतरच्या सत्राची सुरुवात पंडित रघुनंदन पणशीकर यांनी जयपूर घराण्याचा पारंपरिक ( Pune ) राग असलेल्या सावनी नट या रागाने  केली. यामध्ये त्यांनी जयपूर घराण्याच्या पारंपरिक विलंबित आणि द्रुत बंदिशी सादर केल्या. गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचा राघवेंद्र स्वामी यांवरील अभंग सादर करीत त्यांनी समारोप केला.रघुनंदन पणशीकर यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी), सौरभ काडगावकर, राधिका जोशी, शुभम खंडाळकर, विनय रामदासी, केदार जोशी, श्रीनिधी देशपांडे व ओंकार आलम यांनी तानपुरा साथसंगत केली.
या आधी नाट्यसंपदा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर पुरस्कार ग्रॅमी पुरस्कार विजेते पद्मभूषण पं विश्व मोहन भट्ट यांना बिभास आणि निहार आमोणकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.कलाकारांच्या सातत्यपूर्ण संगीत सेवेकरिता प्रतिष्ठानच्या  वतीने दरवर्षी गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर पुरस्कार दिला जातो. रोख रुपये 51 हजार, मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

 

पुरस्काराला उत्तर देताना पंडित विश्व मोहन भट्ट  म्हणाले, “खरेतर गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार हा एका गायकाला मिळायला हवा. मात्र यासाठी माझी निवड करण्यात आली म्हणून मी महोत्सवाचा आभारी आहे. आज मी खूप खूष आहे कारण ज्यांना आम्ही लहानपणापासून पूजत आलो, ऐकत आलो त्यांच्या नावाच्या महोत्सवात हा सन्मान ( Pune ) मला प्रदान होत आहे तोही त्यांच्या आईंच्या नावाने ही मोठी बाब आहे.
“जेव्हा गानसरस्वती किशोरीताई आमोणकर गायच्या तेव्हा हजारो कोकिळा गातायेत असा भास व्हायचा. त्यांच्या गाण्यात रागाची शुद्धता होती. त्यांनी जयपूर अत्रौली घराण्याच्या गायकीला नवा आयाम तर दिलाच यासोबत या घराण्याची गायकी, चीजा त्यांच्या गायकीतून पुढच्या पिढीला मिळत गेल्या. त्यांचे गाणे म्हणजे एखादा बगीचा फुलल्याची, बहार आल्याची जणू जाणीव होती. त्यांच्या गायकीत एक चमक होती. असे कलाकार मोजकेच होतात आणि किशोरीताई या त्यांपैकी एक होत्या, अशा भावना पंडित भट्ट यांनी व्यक्त केल्या.
यावेळी पंडित विश्व मोहन भट्ट यांनी ‘म्हारो प्रणाम…’ चे बोल गुणगुणत उपस्थितांचे नमस्कार स्वीकारले.पंडित विश्व मोहन भट्ट यांनी यावेळी स्वतः तयार केलेल्या मोहनवीणेवर स्वतः रचलेला राग विश्वरंजनी सादर केला. यामध्ये त्यांनी आलाप, जोड -आलापचे दमदार सादरीकरण केले. यावेळी त्यांचे शिष्य आणि सुपुत्र पंडित सलील भट्ट यांनी सात्विकवीणेवर सहवादन केले.
पंडित विश्व मोहन भट्ट यांनी स्वतः मोहनवीणा आणि सात्विकवीणा यांची निर्मिती केली असून आज त्यांनी स्वतः पुणेकर रसिकांसमोर त्याचे केलेले सादरीकरण पुणेकरांना वेगळीच अनुभूती देणारे ठरले.पंडित विश्व मोहन भट्ट यांचे मोहनवीणा वादन आणि पंडीत सलील भट्ट यांचे सात्विकवीणा वादन यांनी उपस्थितांना एकाच वेळी सप्तकात अनेक वीणा वाजत असल्याचा अनुभव दिला. ग्रॅमी पुरस्कार विजेती रचना सादर करीत या दोघांनी आपल्या वादनाचा समारोप केला.पंडित विश्व मोहन भट्ट आणि पंडीत सलील भट्ट यांना तबल्यावर अभिषेक मिश्रा यांनी समर्पक साथ ( Pune ) केली. 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.