Pune : पीएमपीचे स्पेअरपार्ट भंगारात काढून कोट्यवधीचा भ्रष्टाचार ; विरोधी पक्षनेत्यांचा आरोप

एमपीसी न्यूज- एका बाजूला नियमित देखभाल दुरूस्ती होत नसल्याने पीएमपी बसचे ब्रेकडाऊन, अपघात होणे तसेच आग लागण्याच्या घटना वाढत असताना बसच्या देखभाल दुरूस्तीसाठी आवश्‍यक साहित्य न घेता अनावश्‍यक साहित्य खरेदी करून लाखो रुपयांचे साहित्य भंगारात टाकले जात असल्याचा आरोप महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी केला आहे.

पीएमपीचे हे साहित्य जाणून-बुजून भंगारात टाकून विकण्यात येत असून नंतर तेच साहित्य रंगरंगोटी करून पुन्हा पीएमपीला विकले जात आहे. त्यामुळे या प्रकाराची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी तुपे यांनी केली आहे.

चेतन तुपे म्हणाले, “बस जळण्याच्या तसेच ब्रेकडाऊनच्या घटना गेल्या काही दिवसात वाढल्या आहेत. या घटना बाबत प्रशासनाकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून गाडयांसाठी आवश्‍यक असलेले स्पेअर पार्ट नसल्याचे सांगत वारंवार खरेदी केली जाते” मात्र, दुसरीकडे अशा प्रकारे स्पेअर पार्ट स्वारगेट येथील इमारतीच्या गोडाऊनमध्ये अक्षरश: गंजलेल्या अवस्थेत असल्याचे तुपे यांनी निदर्शनास आणून दिले.

तसेच महापालिका कितीही तूट आली, तरी संचलन तूट देणारच हे माहीत असल्याने पीएमपीकडून अशा प्रकारे उधळपट्टी केली जात असून सत्ताधारी भाजपचे संचालक मंडळ त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही तुपे यांनी यावेळी केला. एका बाजूला सर्व सामान्य नागरिकांवर प्रत्येकवेळी दरवाढीची टांगती तलवार ठेवून विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या पासच्या किमती वाढविल्या जात असतानाच दुसऱ्या बाजूला ही उधळपट्टी योग्य नाही. त्यामुळे हे प्रकार तातडीने थांबविण्यात यावेत, अशी मागणीही तुपे यांनी यावेळी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.