Pimpri : मित्र-मैत्रिणीची भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या तिघांना मारहाण

एमपीसी न्यूज – तोंडओळख असलेल्या मित्राचे आणि त्याच्या मैत्रिणीचे भांडण चालू असताना मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तिघांना टोळक्याने मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 31) सकाळी अकराच्या सुमारास महेशनगर चौपाटी, संत तुकारामनगर येथे घडली.

मुवाज शफिक मुजावर (वय 18, रा. विठ्ठलनगर, नेहरूनगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार वीरेंद्र (वय 20, रा. अजमेरा, पिंपरी), सोहेल इनामदार (वय 22, नेहरूनगर, पिंपरी), फैज इनामदार (वय 20, रा. नेहरूनगर, पिंपरी), नॉडी (वय 20, रा. अजमेरा, पिंपरी) आणि त्यांचे चार साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास मुवाज यांच्या तोंडओळखीचा मित्र वीरेंद्र याचा त्याच्या एका मैत्रिणीसोबत वाद सुरु होता. त्यामुळे मुवाज आणि त्यांचे दोन मित्र अयान सय्यद (वय 18), प्रकाश गाढवे (वय 20) यांनी मिळून वीरेंद्र आणि त्याच्या मैत्रिणीचा वाद सोडविण्यासाठी वीरेंद्रला समजावून सांगितले.

या रागातून वीरेंद्र याने त्याच्या साथीदारांना एकत्र करून मुवाज आणि त्यांच्या मित्रांना लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये मुवाज आणि त्यांचे दोन्ही मित्र जखमी झाले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.