Pune : भरधाव होंडा सिटी कारने घेतला आजी-नातवाचा बळी

एमपीसी न्यूज- भरधाव वेगातील होंडा सिटी कारने दिलेल्या धडकेमध्ये आजी व नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर अन्य एकजण जखमी झाला. हा अपघात खराडीतील रेडिसन हॉटेलसमोरील रस्त्यावर बुधवारी (दि. 19 ) रात्रीच्या सुमारास झाला. अपघातानंतर होंडा सिटी कारचा चालक फरार झाला आहे.

या भीषण अपघातात शांताबाई साहेबराव सोनवणे (वय 61) व नयन रमेश मोकळे (वय 11) या त्यांच्या नातवाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर होंडा सिटी कारचा चालक फरार झाला आहे. होंडा सिटी कार रेडिसन हॉटेलकडुन टस्कन सोसायटी, खराडीकडे निघाली होती.

चंदननगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री चंदननगर व परिसरातील सातव्या दिवसाच्या गणपती विसर्जनाच्या मिरवणुका सुरू होत्या. रात्री साडेआठ वाजण्याच्या समारास एका होंडा सिटी कारने काही वाहनांना रेडीसन हॉटेलसमोर धडक दिल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाकडून चंदननगर पोलिसांना मिळाली होती. चंदननगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन अपघातातील जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. या अपघातात शांताबाई सोनवणे व नयन मोकळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर कराड येथील 40 वर्षीय इसमदेखील जखमी झाला असुन त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी होंडा सिटी कार (एमएच 12 एलडी 1011) मधील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.