Khadki : गणपती बाप्पा आणि ताबूत एकाच मांडवात ; खडकीमध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्याचे अनोखे दर्शन

एमपीसी न्यूज- यंदा 31 वर्षानंतर मुस्लिम धर्मियांचा मोहरम सण आणि हिंदूंचा गणेशोत्सव एकाच कालावधीत आला आहे. परंतु, कोणत्याही प्रकारची धार्मिक तेढ निर्माण न करता या उत्सवामध्ये दोन्ही समाजाच्या सुजाण नागरिकांनी एक चांगला आदर्श घालून दिला आहे. खडकीच्या मधला बाजार मित्र मंडळ आणि पैलवान ताजिया यांनी एकत्रितपणे दोन्ही उत्सव साजरा करीत बाप्पांची मूर्ती आणि मोहरमचा ताबूत एकाच मांडवात स्थापित करून हिंदू – मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडविले आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यामागील लोकमान्य टिळकांची भूमिका अधोरेखित झाली आहे.

यंदा ३१ वर्षानंतर मोहरम आणि गणेशोत्सव हे एकाच कालावधीत आले आहेत. खडकी येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मधला बाजार मित्र मंडळ आणि पैलवान ताजिया यांनी एकत्रितपणे दोन्ही उत्सव साजरा करण्याची भूमिका घेतली आहे. या दोन्ही समाजातील बांधवांनी मिळून एकाच मांडवात पहिल्यांदा ‘ताजे’ आणि ‘पंजे’ यांची तर दुसऱ्या दिवशी वाजतगाजत गणपती बाप्पाची भक्तीभावाने प्राणप्रतिष्ठा केली.

पंजेला मुस्लिम समाजात सवारी म्हणतात. याठिकाणी गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी येणारे भक्त हे ताजे, पंजे यांचे देखील दर्शन घेतात. तर ताजे आणि पंजे यांचं दर्शन घ्यायला येणारे मुस्लिम बांधवही बाप्पाचं दर्शन घेतल्याशिवाय जात नाहीत. हा योगायोग 1986 नंतर आता जुळून आला आहे. 1984, 85,86 या वर्षात तीन ते चार दिवसांच्या फरकाने मोहरम आणि गणेशोत्सव साजरा झाला होता. येणाऱ्या वर्षात देखील तीन चार दिवसांचा फरक असणार आहे. त्यामुळे यंदाचा उत्सव दोन्ही समाजांचे प्रतिनिधित्व करणारा असा खास आहे.

एरवी धार्मिक वादातून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणारे हिंदू मुस्लिम गुण्यागोविंदाने गणेशोत्सव आणि मोहरम एकत्रितपणे साजरा करीत असल्याने खऱ्या अर्थाने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यामागील लोकमान्य टिळकांचा हेतू सफल झाल्याचा प्रत्यय येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.