Talegaon Dabhade : भाषेच्या कौशल्यासाठी सृजनात्मक भाषा आत्मसात करा- डॉ. सदानंद भोसले

एमपीसी न्यूज- भाषेचे कौशल ज्याच्याकड़े असेल तोच खऱ्या अर्थाने जीवनात यशस्वी मनुष्य होउ शकतो. त्यासाठी आपल्याला सृजनात्मक भाषा आत्मसात करावी लागेल असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. सदानंद भोसले यांनी व्यक्त केले. इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालय हिंदी विभागाच्या वतीने हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे होते. तसेच हिंदी विभाग प्रमुख डॉ. मधुकर देशमुख उपस्थित होते.

डॉ. सदानंद भोसले यानी अत्यंत मनोरंजक शब्दात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आज रचनात्मक आणि सर्जनात्मक भाषेची खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे. आपण आता पत्र, निबंध लिहायला विसरलो कारण आता फाॅरवर्डचा जमाना आला आहे. आज आपण व्हाट्सअप, फेसबुकच्या दुनियेत आहोत आपण फक्त फाॅरवर्ड करण्यातच धन्यता मानतो आहोत.

सृजनात्मकता रचनात्मकता विसरलो आहोत. आपल्या जवळ भाषा असायला हवी. भाषेचे कौशल ज्याच्याकड़े असेल तोच खऱ्या अर्थाने जीवनात यशस्वी मनुष्य होउ शकतो. आपण गप्प बसतो कारण आपल्याकडे सृजनात्मक भाषा नाही. आपल्याला भाषा आत्मसात करावी लागेल. मग त्यासाठी आपल्याला बोलावे लागेल, नाचावे लागेल, गावे लागेल, चित्रे काढावे लागतील. आपले ध्येय आपल्यालाच निश्चित करावे लागेल. त्यासाठी आपल्याला कोणीही मदत करणार नाही. अशावेळी आपली मदत फक्त सृजनात्मक भाषाच करेल. त्यासाठी रचनात्मक भाषेची निर्मिती करा. भाषा एक असली तरी ज्याच्याकड़े सृजनात्मक भाषा आहे तो मागे राहणार नाही. सृजनात्मक भाषाच रोजगाराची खरी जननि आहे. मग तो विद्यार्थी कोणत्याही शाखेचा असो. त्यासाठी अनेक भाषांपैकी हिंदी ही प्रमुख भाषा आहे आज हिंदी भाषेमध्ये सिनेमा, मिडिया, संगणक, इन्टरनेट, जाहिरात क्षेत्र इत्यादि अनेक क्षेत्रांमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याची क्षमता आहे असे त्यांनी सांगितले.

डॉ. मधुकर देशमुख यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये सांगितले की, हिंदी भाषेला संविधानाने राजभाषेचा दर्जा दिला असेल तरी आज हिंदी भाषेची अवस्था अनुदित भाषेप्रमाणे झालेली आहे. ही शोकांतिका आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकाने राजभाषा हिंदीची अस्मिता जपली पाहिजे

डॉ. संभाजी मलघे म्हणाले, ” आपल्या सर्वांची मातृभाषा मराठी आहे. मराठी केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे पण हिंदी भाषा ही सम्पूर्ण देशाची राष्ट्रभाषा आहे तिचा आदर करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे”

सूत्रसंचालन व आभार प्रा. राजेंद्र आठवले यानी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.