Talegaon Dabhade : इंद्रायणी महाविद्यालयात काव्य संमेलनाने साजरा झाला मराठी भाषा गौरव दिन 

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयात ( Talegaon Dabhade) वि वा शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन काव्य संमलेनाने साजरा करण्यात आला. कवी भरत दौंडकर यांची ‘बाप’, नारायण पुरी यांची ‘प्रेमाचा झांगडगुत्ता’, कालिका बापट यांची ‘चाफा फुले, बकुळ फुले’ यासह हेमांगी नेरकर यांच्या आशयगर्भ कवितांनी उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतला.

कार्यक्रमासाठी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, मराठी विभागप्रमुख डॉ. विजयकुमार खंदारे तसेच गोव्याहून नामांकित कवयित्री कालिका बापट, आरती प्रभू यांच्या कन्या हेमांगी नेरकर, कवी भरत दौंडकर, नारायण पुरी हे निमंत्रित कवी उपस्थित होते.

Pimpri : आता महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्यास थेट फौजदारी

कवी भरत दौंडकर यांनी ‘बाप’ ही कविता सादर करून वातावरण भावनिक केले. तर नारायण पुरी यांनी प्रेमाचा जांगडगुत्ता ही कविता सादर करून वातावरण आल्हाददायक बनविले. शब्द ही आपली अभिव्यक्ती असते. समाज म्हणून प्रेमातून प्रेमाकडचा मोठा प्रवास कवितेमुळे सुसह्य होतो, असे नारायण पुरी यांनी सांगितले. कालिका बापट यांनी ‘चाफा फुले, बकुळ फुले’ ही कविता गायली. तर हेमांगी नेरकर यांच्या आशयगर्भ कवितांनी उपस्थिताना अंतर्मुख केले. प्रेम विवाह, नातेसंबंध आणि समाजातील विविध विषयांना कवेत घेत काव्य मैफिल रंगत गेली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत शेटे आपल्या अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, मराठी भाषेचा अभिमान हा फक्त गौरव दिनापुरताच मर्यादित न राहता तो पदोपदी जपणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मराठी भाषेचा वारसा हा समृद्ध असून ती एक अभिजात भाषा आहे, याचा आपल्याला नक्कीच अभिमान असला पाहिजे. भाषिक अस्मिता हीच आपली खरी ओळख असायला पाहिजे असे मत व्यक्त करून त्यांनी कवी कुसुमग्रजांच्या काव्य प्रतिभेला अभिवादन केले.

प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी, सातवाहन ते यादव कालखंड, चक्रधर स्वामी, संत ज्ञानेश्वर माऊलींपासून ते लाभले आम्हास भाग्य म्हणणाऱ्या कवी सुरेश भटांपर्यंत मराठीचा समृद्ध वारसा आपल्याला लाभला असल्याचे सांगितले. मातृभाषेचा वापर हा बोलताना आणि व्यवहारात झालाच पाहिजे, यासाठी आपण प्रत्येक मराठी मातृभाषिक आग्रही असलो पाहिजे असे सांगत त्यांनी आपली ‘चिंधी’ ही कविता सादर केली.

स्वागत व प्रास्ताविक विभागप्रमुख डॉ. विजयकुमार खंदारे यांनी केले. त्यांनी कवी कुसुमाग्रजांच्या शब्द प्रतिभेचा परिचय करून दिला. तसेच विभागाच्या माध्यमातून वेळोवेळी आयोजित करण्यात येत असणाऱ्या कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. सूत्रसंचालन डॉ. संदीप कांबळे यांनी केले. प्रा. सत्यजित खांडगे यांनी आभार ( Talegaon Dabhade) मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.