Talegaon Dabhade : नवीन शैक्षणिक धोरणाबाबत एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे इंद्रायणी महाविद्यालयात आयोजन

एमपीसी न्यूज – इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालयाच्या ( Talegaon Dabhade) वतीने नवीन ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020: आव्हाने आणि संधी’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे व कार्यवाह चंद्रकांत शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वाणिज्य विभागाच्या अंतर्गत या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजी मलघे यांनी दिली. शनिवार (दि.6 एप्रिल) रोजी सकाळी 9 वाजता इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या कांतीलाल शहा विद्यालयाच्या सभागृहात या चर्चासत्राला सुरुवात होईल.

महाराष्ट्र राज्याच्या उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या शुभहस्ते चर्चासत्राचे उद्घाटन होणार आहे. पहिल्या सत्रात बीजभाषक म्हणून पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू व राज्य सरकारच्या सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन करमळकर हे उपस्थित राहणार आहेत. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विजय खरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे पहिल्या सत्राचे अध्यक्षपद भूषविणार आहेत.

Talegaon Dabhade : रोटरीतर्फे नगर परिषद शाळेला ग्रंथालयासाठी कपाट व पुस्तके भेट  

दुसऱ्या सत्राची विभागणी ही शाखांनुसार केलेली असून कला शाखेसाठी डॉ. प्रभाकर देसाई हे मार्गदर्शन करणार आहेत आणि या सत्रासाठी डॉ. विजय खरे हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. वाणिज्य शाखेसाठी डॉ. यशोधन मिठारे यांचे मार्गदर्शनपर सत्र होणार असून या सत्रासाठी प्राचार्य डॉ. अनिल अडसुळे हे अध्यक्ष म्हणून उपस्थित असणार आहेत. मॉडर्न महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.रवींद्र क्षीरसागर हे विज्ञान शाखेच्या वतीने आपले विवेचन करणार असून खेड येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिरीष पिंगळे हे या सत्राचे अध्यक्षपद भूषविणार आहेत.

समारोप सत्रासाठी पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.अरुण अडसूळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत तर पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. संजय कप्तान हे मार्गदर्शन करणार आहेत. या सत्राचे अध्यक्षपद इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे भूषविणार आहेत.

सदर चर्चासत्राचे आयोजन व्यापक प्रमाणावर केले असून मावळ तालुक्यातील जवळच्या सर्व महाविद्यालयांना या चर्चासत्रामध्ये समाविष्ट करून घेण्याचे नियोजन असून आसपासच्या सर्व महाविद्यालयातील प्राध्यापकांनी नवीन शैक्षणिक धोरणाबाबत माहिती जाणून घेण्यासाठी या चर्चासत्रामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संभाजी मलघे यांनी केले आहे. वाणिज्य विभागप्रमुख प्रा.रूपकमल भोसले व वाणिज्य विभागातील इतर सर्व प्राध्यापकांच्या मदतीने हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले ( Talegaon Dabhade) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.