Chinchwad : बेगडेवाडी रेल्वे स्थानकातील बुकिंग ऑफिसमध्ये चोरी; रेल्वे पोलिसांनी ठोकल्या दोघांना बेड्या

एमपीसी न्यूज – पुणे-लोणावळा लोहमार्गावरील बेगडेवाडी रेल्वे स्थानकातील (Chinchwad) बुकिंग ऑफिस फोडून रोख रक्कम चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना चिंचवड रेल्वे पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चोरी केलेली सर्व रक्कम जप्त करण्यात आली आहे. आरोपींनी बुकिंग ऑफिसची रेकी करून हा गुन्हा केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

 

फिरोज अदालत हाशमी, सुनील मल्हारी तलवारे (वय 37, रा. तापकीर नगर, काळेवाडी) (Chinchwad)अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

 

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 एप्रिल रोजी अज्ञात चोरट्यांनी पुणे-लोणावळा लोहमार्गावरील बेगडेवाडी रेल्वे स्थानकातील बुकिंग ऑफिस फोडले. बुकिंग ऑफिस मधून चोरट्यांनी 11 हजार 620 रुपये रोख रक्कम चोरून नेली. याबाबत चिंचवड रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

या गुन्ह्यातील एक आरोपी फिरोज हाशमी हा इंद्रायणी नदीत अंघोळीसाठी आला असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी नदीपात्रालगत सापळा लावून फिरोज याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आपल्या साथीदारासोबत मिळून हा गुन्हा केल्याचे कबूल केले. रेल्वे पोलिसांनी फिरोज कडून पाच हजार 500 रुपये रोख रक्कम जप्त केली.

 

तसेच या गुन्ह्यामध्ये त्याला सुनील तलवारे याने मदत केली असल्याचे त्याने सांगितले. सुनील हा भाटनगर, पिंपरी येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच बुकिंग ऑफिस मधून चोरलेल्या रकमेतील सहा हजार 120  रुपये त्याने आपल्या घरी ठेवले असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्या घरातून ही रोख रक्कम जप्त केली. बुकिंग ऑफिस फोडून चोरलेली सर्व रक्कम रेल्वे पोलिसांनी जप्त केली आहे. या गुन्ह्यात आणखी एक साथीदार असल्याने रेल्वे पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

 

 

Pune: शरद पवारांबद्दलचे पंतप्रधानांचे वक्तव्य दुदैवी ; काँग्रेसचे जेष्ठ नेते उल्हास पवार यांची खंत- मोदींनी आत्मविश्वास गमावल्याचीही टीका

रेकी करून चोरी
चोरी करण्यापूर्वी आरोपींनी रेल्वे स्थानकाची रेखी केली होती. रेल्वे स्थानकातील बुकिंग ऑफिस मधून दररोज जमा झालेली कॅश बँकेत जमा केली जाते. मात्र शनिवार आणि रविवारी जमा झालेली कॅश सोमवारी जमा केली जाते. त्यामुळे आरोपींनी सोमवारी चोरी करण्याचा कट रचला होता. त्यानुसार आरोपींनी रेकी करून सोमवारी चोरी केली होती.

 

 

 

ही कामगिरी चिंचवड रेल्वे पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अमित कुमार यादव, उपनिरीक्षक डी एन लाड, पोलीस अंमलदार संतोष बांदल, श्रीपाद यावलकर, आर बी जाधव यांच्या पथकाने केली.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.