Chakan : झाडाला गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

खालुंब्रे येथील प्रकार

एमपीसी न्यूज – झाडाच्या फांदीला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून अंदाजे वीस ते पंचवीस वर्षीय अनोळखी तरुणाने आत्महत्या केल्याचा  प्रकार खालुंब्रे ( ता. खेड ) गावच्या हद्दीत उघडकीस आला आहे. संबंधिताची ओळख अद्याप पटली नसल्याने आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. चाकण पोलिसांत शनिवारी ( दि. १० ) याप्रकरणी आकस्मित मयत अशी नोंद करण्यात आली आहे.

या बाबतची अधिक माहिती अशी की,  खालुंब्रे ( ता.खेड ) गावच्या हद्दीतील केएसएच कंपनीच्या समोरील मोकळ्या जागेत एक पत्रा शेड आहे. या पत्र्याच्या शेडलगत असलेल्या ओढ्याजवळील एका झाडाच्या फांदीला सबंधित अनोळखी तरुणाने दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. त्याची ओळख व त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजले नसून,   खालुंब्रे ( ता. खेड ) गावचे पोलीस पाटील रवींद्र मनाजी तुळवे ( वय – ५९ वर्षे, रा. तुळवेवस्ती, खालुंब्रे,) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
सबंधित तरुणाचा रंग काळा सावळा, डोक्याचे केस काळे, काळ्या मिशा, अंगात सफेद रंगाचा फुल बाह्याचा शर्ट, नेसणीस निळ्या रंगाची जीन्स , हातात रंगीत दोरा असे त्याचे वर्णन आहे. या तरुणा बद्दल कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी चाकण पोलीस ठाण्याशी संपर्क ( फोन नं. ०२१३५ – २४९३३३ ) साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.