Talegaon : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ज्योती चव्हाण यांचे निधन

एमपीसी न्यूज – तळेगाव येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ज्योती जगन्नाथ चव्हाण (वय 57) यांचे रविवारी (दि. 17) अल्पशा आजाराने निधन झाले. सामाजिक सेवेचा वसा घेतलेल्या ज्योती चव्हाण यांचे मृत्यू पश्चात देहदान करण्यात आले. त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रात भरीव काम केले आहे.

ज्योती चव्हाण यांना मागील काही दिवसांपासून शारीरिक अस्वास्थ्य आले होते. त्यांच्यावर पुण्यातील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची रविवारी प्राणज्योत मालवली. मृत्यू पश्चात देहदान करण्याची त्यांची इच्छा होती. त्याप्रमाणे तळेगाव येथील माईर्स वैद्यकीय महाविद्यालय आणि तळेगाव ग्रामीण रुग्णालय येथे देहदान करण्यात आले. संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि एक होऊ-नेक होऊ चळवळीचे प्रणेते जग्गनाथ चव्हाण यांच्या त्या पत्नी होत.

  • ज्योती चव्हाण अखिल भारतीय मराठा विकास परिषदेच्या महिला संघटक, आरोग्य क्षेत्रात काम करणा-या शिवमुद्रांकन प्रतिष्ठान संस्थेच्या त्या संस्थापक कार्याध्यक्षा होत्या. शिवमुद्रांकन पत्रिका या मासिकाच्या त्या व्यवस्थापिका होत्या. राष्ट्रीय शिक्षण मंडळ पुणे संस्थेच्या सदस्य पदावर त्यांनी सेवा केली. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वॉर्ड शिक्षण समितीच्या सदस्य म्हणून त्यांनी शैक्षणिक कार्य केले. धर्मवीर संभाजी नागरी पतसंस्थेच्या संचालिका म्हणून त्या काम पाहत होत्या.

तळेगाव येथील पहिल्या नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या महिला प्रमुख, शिवराई महिला बचत गटाच्या संस्थापक कार्यवाह होत्या. जाणता राजा या ऐतिहासिक महानाट्याच्या निर्मितीत पहिल्या दहा प्रयोगापर्यंत त्यांनी सहभाग घेतला. रायगड लोह रज्यु येथील संग्रहालयात त्यांनी रंगीत शिवचरित्र परदर्शिका आणि छायाचित्रांची निर्मिती केली.

  • शिवनेरी जन्मोत्सव समितीच्या वतीने ‘रुग्णसेवा पुरस्कार’, धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानचा ‘शंभुसेवा पुरस्कार’, केसरी चॅरिटेबल ट्रस्टचा ‘कै. जयंतराव टिळक स्मृती पुरस्कार’, समर्थ व्यासपीठचा ‘समर्थ पुरस्कार’ देऊन त्यांना गौरविण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.