Pune : ‘एव्हीएशन गॅलरी’ अजूनही अधांतरीच

पालिकेचे दुर्लक्षामुळे काम अपूर्ण – माजी स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके
 
एमपीसी न्यूज – विमानाने प्रवास करावा असे प्रत्येकालाच वाटत असते. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वानाच विमानाचे आकर्षण असते. त्यामुळे विमान प्रवास त्यातील करिअरच्या संधी याबाबत सर्वसामान्यांना माहिती मिळावी यासाठी निर्माण करण्यात आलेली ‘एव्हीएशन गॅलरी’ अजूनही अंधारातच आहे. या प्रकल्पाचे काम अर्धवट असून त्याला निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित त्यामध्ये लक्ष घालून ही गॅलरी लवकरात लवकर पूर्ण करून सर्वसामान्यांसाठी खुली करण्याची मागणी माजी स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन आज (बुधवार) त्यांनी आयुक्तांना दिले.
 
बोडके म्हणाले, विमान प्रवास तसेच अधुनिक तंत्रज्ञान आणि करिअरच्या संधी याबाबत नागरिकांना माहिती मिळावी या उद्देशाने हा लाल बहादूर शास्त्री शाळा क्रमांक 14 येथे एव्हीएशन प्रकल्प सुरू करण्यात आला होता. मात्र पालिकेचे दुर्लक्ष आणि निधी अभावी हा प्रकल्प अपूर्णावस्थेत पडून आहे. विमानाची निर्मितीपासून त्यातील तांत्रिक माहिती, विविध विभाग, विमान प्रवास आणि त्यातील विद्यार्थ्यांसाठीच्या करिअर संधी बाबत प्रदर्शन आणि माहिती या प्रकल्पांतर्गत दिली जाणार आहे. 
 
या प्रकल्पाचे पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र अजून 2 सीटर विमान, विमानची प्रतिकृती, सिम्युलेटर तसेच अन्य सुविधांचे बांधकाम होणे आवश्यक आहे. त्यासाठी सुमारे 2 कोटी रुपयांचा निधी लागणार असून यामध्ये पालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे. तरी आयुक्तांनी यात लक्ष घालून प्रकल्प मार्गी लावण्याची मागणी यावेळी बाळासाहेब बोडके यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.