Pimpri News : ट्रेडिंगमध्ये गुंतवलेले पैसे ग्राहकांना परत न दिल्याची पोलिसात तक्रार केल्याने मारहाण

एमपीसी न्यूज – ट्रेडिंगमध्ये गुंतवलेले पैसे ग्राहकांना परत दिले नाहीत, याबाबत संबंधितांची पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांकडे तक्रार करणा-यास तिघांनी मिळून बेदम मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार 24 जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता एम्पायर इस्टेट, पिंपरी येथे घडली.

अनिल चंद्रशेखर मेहता (वय 44, रा. निगडी, प्राधिकरण) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सचिन वरखेडे (वय 42, रा. जेल रोड, नाशिक), रवींद्र जाधव (वय 30, रा. शिंदेगाव, ता. जि. नाशिक) अश्विन मौड (वय 28, रा. जेलरोड, नाशिक) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन वरखेडे याच्या कंपनीत ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवलेल्या ग्राहकांना त्याने पैसे परत दिले नाहीत. याबाबत फिर्यादी मेहता यांनी नाशिकच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. याचा राग मनात धरून आरोपींनी मेहता यांना एम्पायर इस्टेट, पिंपरी येथे चहाच्या टपरीचे बांबू घेऊन मारहाण केली. यात मेहता यांच्या हातावर, पायावर गंभीर दुखापत झाली. आरोपींनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.