Talegaon Dabhade : महाआरोग्य शिबीरात मावळातील हजारो रुग्णांनी घेतला मोफत औषधोपचारांचा लाभ

एमपीसी न्युज – आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मावळ राष्ट्रवादी काँग्रेस व मावळ डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीने तळेगाव दाभाडे शहरात शुक्रवार (दि.१४), शनिवार (दि.१५) व रविवार (दि.१६) असे तीन दिवसीय भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात मावळ तालुक्यातील हजारो रुग्णांनी सहभागी होऊन मोफत औषधे व उपचार घेतले आहेत.
महाआरोग्य शिबीर भव्य स्वरूपात राबविण्यात येत असताना येथे येणाऱ्या नागरिकांची शिस्तबध्द पध्दतीने नोंदणी व तपासणी करून रुग्णांच्या आवश्यकतेनुसार त्यांना तात्काळ मोफत एमआरआय तपासणी, सीटी स्कॅन तपासणी, सोनोग्राफी, एक्स रे, रक्त तपासणी श्रवणयंत्र, चष्मे, वॉकर,पाठीचा पट्टा, मानेचा पट्टा, औषधे इत्यादी मोफत उपलब्ध करून देण्यात आले. या शिबिरात सहभागी झालेल्या सर्व नागरिकांसाठी जेवणाची सोय देखील करण्यात आली होती.

तसेच या महाआरोग्य शिबीरांतर्गत तपासणी केल्यानंतर ज्या रुग्णांना  हृदय, अन्ननलिका, मोतीबिंदू, हाडांचे फ्रॅक्चर,कान नाक घसा, श्वसन नलिका, अंगावरील मोठ्या चरबीच्या गाठी, मणका, किडनी, गर्भपिशवी,मुतखडा, सांधे, अपेंडिक्स, मुळव्याध,दंत चिकित्सा, हार्निया, पित्ताशय पित्ताशयात खडे, मूत्राशयाच्या, कॅन्सर, गर्भाशयातील गाठी, डोळ्यांच्या व मेंदूच्या इत्यादी शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे.अशा रुग्णांना त्यांच्या सोयी नुसार मावळ तालुक्यासह जिल्ह्यातील नामांकित रुग्णालयांमध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
या आरोग्य शिबिरात सर्व आजारांवरील तज्ञ डॉक्टर उपलब्ध असल्याने उपचार घेण्यासाठी आलेले नागरिकांच्या आजारांचे योग्य निदान करून त्यांना योग्य उपचार देण्यात आल्याने रुग्णांनी देखील समाधान व्यक्त केले. व मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करून मोफत उपचार व औषधे उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार शेळके यांचे आभार व्यक्त केले.
आमदार सुनिल शेळके म्हणाले, “ग्रामीण भागातील नागरिकांना आजाराचे निदान झाल्यावर वैद्यकीय खर्चाची तरतूद होऊ न शकल्याने ते आजाराकडे दुर्लक्ष करतात.परंतु महाआरोग्य शिबीरासारख्या सामजिक उपक्रमामध्ये त्यांना मोफत व दर्जेदार उपचार घेता आले याचे समाधान वाटते.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.