Urali Kanchan : उरळी कांचन येथे भीषण अग्नितांडव; कापड व फर्निचरचे दुकान जळून खाक

एमपीसी न्यूज – सोलापूर रस्त्यावरील उरळी कांचन येथे आज (शुक्रवार) मध्यरात्रीनंतर आग लागून एक कापडाचे आणि त्याच्या शेजारील दोन फर्निचरची दुकाने जळून खाक झाली. शेजारीच लाकडी वखार असल्याने आग मोठ्या प्रमाणात भडकली. अग्निशामक दलाच्या जवानांच्या प्रयत्नांनी सध्या आगीवर नियंत्रण मिळवले असून कुलिंगचे काम सुरू आहे.

सोलापूर रस्त्यावरील उरळी कांचन येथे लाकडाच्या वखारीला मोठ्या प्रमाणात आग लागून भीषण अग्नितांडव पाहावयास मिळाले. स्थानिक नागरिकांनी अग्निशामक दलाला पहाटे चार वाजता याबाबत माहिती दिली. त्यांनी तातडीची कारवाई करत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मोठे प्रयत्न केले. 3 गाड्यांच्या सहाय्याने जवळपास 3 तास हे आग विझवण्याचे काम सुरू आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आले असून सध्या काम सुरू आहे.

अधिकारी सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, येथे रस्त्यावर लाकडाची मोठी वखार आहे. त्याच्या शेजारी कापडाचे आणि फर्निचरची दोन दुकाने आहेत. या अग्नितांडवात कापडाचे दुकान जळून खाक झाले तर शेजारील दोन्ही फर्निचरची दुकानेही जळाली आहेत. मात्र नेमकी सुरुवातीला आग कशाला लागली हे सांगणे अवघड आहे, असे त्यांनी सांगितले. मात्र कापडाचे दुकान ज्या पद्धतीने जळाले त्यानुसार आग सुरुवातीला कापडाच्या दुकानाला लागली असावी, असा अंदाज आहे. तसेच स्थानिक नागरिकांच्या सांगण्यानुसार रात्री दीडच्या सुमारास कापडाच्या दुकानातून थोडा फार धूर निघत होता. मात्र, त्यावेळी याबाबत अग्निशामक दलाला कळवण्यात आले नव्हते. नंतर आग मोठ्या प्रमाणात भडकून कापडाचे संपूर्ण दुकान जळून खाक झाले. शेजारीच लाकडी वखार व फर्निचर असल्याने आगीने पेट घेऊन रौद्र रूप धारण केले. त्यानंतर पहाटे चार वाजता याबाबत अग्निशामक दलाला कळविण्यात आले.

माहिती मिळताच जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. सध्या कुलिंगचे काम सुरू आहे. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.