Pimpri: वाघोली योजनेतील पाणी पिंपरी-चिंचवड शहराला देण्यास पुणे महापालिकेचा नकार!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी वाघोली ग्रामीण पाणीपुरवठा योजना मंजूर कोट्यासह पिंपरी महापालिकेस हस्तांतरीत करावी, अशी पिंपरी महापालिकेने केलेली मागणी पुणे महापालिकेने फेटाळून लावली आहे. ही योजना पिंपरी महापालिकेला हस्तांतरीत करणे सध्या शक्य नाही, असे स्पष्ट करत पुणे महापालिकेने पिंपरी शहरास पाणी देण्यास इन्कार केला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी पवना धरणातून 6.55 टीएमसी इतके पाणी आरक्षित आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार 17  लाख 30 हजार लोकसंख्येला शहराचा पाण्याचा मापदंड 135 लिटर प्रति माणशी प्रति दिन याप्रमाणे ठरविण्यात आला आहे. शहराची लोकसंख्या आणि मापदंडाप्रमाणे वार्षिक 3.61  टीएमसी पाणीपुरवठा होणे अपेक्षित आहे. मात्र, शहराची लोकसंख्या सध्या 20 लाखाच्या पुढे पोहोचली आहे. त्यानुसार, 6.55 टीएमसी मंजूर आरक्षणापैकी सध्या 4.84  टीएमसी इतका पाणीकोटा महापालिकेसाठी मंजूर आहे. 2008 साली महापालिकेला आणखी 1.31 टीएमसी पाणी कोटा मंजूर झाला. मात्र, महापालिकेची टप्पा क्रमांक 4 ही योजना अद्याप कार्यान्वित नसल्याने 4.84  टीएमसी इतका पाणीकोटा मंजूर आहे. त्यामुळे महापालिकेने पाटबंधारे विभागाकडे जादा पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यावर पाटबंधारे विभागाने 13 सप्टेंबर 2017  रोजी पिंपरी महापालिकेला पत्र पाठविले.  

पिंपरी महापालिकेचा सध्याचा प्रत्यक्ष वार्षिक पाणीवापर पाच टीएमसी इतका होत आहे. हा पाणीवापर आरक्षित पाणी क्षमतेपेक्षा जादा होत आहे. प्रत्यक्ष पाणीवापर आणि लोकसंख्येनुसार लागणारे पाणी यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे. ही तफावत कमी करण्यासाठी पाण्याचा वापर मर्यादेत करणे आवश्यक आहे. त्यासाठी पाणीपुरवठा वितरण प्रणाली दुरूस्ती, पाणीपुरवठ्यातील गळती रोखणे, नवीन वितरणप्रणाली करणे आदी उपाययोजना कराव्यात. भविष्यात आपल्याला वाढीव पाणी मिळणार नाही, असे पाटबंधारे विभागाने या पत्राद्वारे स्पष्ट कळविले. त्यामुळे महापालिकेने पाण्यासाठी इतर स्त्रोत उपलब्ध होतात का याची चाचपणी केली.   

वाघोली ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पवना नदीवरील रावेत बंधा-यातून अशुद्ध पाणी उपसून चिखली जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध केले जाते. 27  एमएलडी क्षमतेच्या या योजनेद्वारे चिखली येथील 40 लाख लीटर क्षमतेच्या पाण्याच्या उंच टाकीद्वारे पुणे महापालिका हद्दीतील गणेशनगर, कळस, धानोरी, विश्रांतवाडी, टिंगरेनगर, लोहगाव, विमाननगर, खराडी, खांदवेनगर या भागांना पाणीपुरवठा करण्यात येतो.

त्यामुळे 27 एमएलडी क्षमतेची वाघोली ग्रामीण पाणीपुरवठा योजना मंजूर कोट्यासह पिंपरी महापालिकेस हस्तांतरीत करण्यात यावी, अशी मागणी पिंपरी महापालिकेने पुणे महापालिकेकडे केली. त्यावर पुणे महापालिकेने 12 ऑक्टोबर रोजी पत्राद्वारे उत्तर दिले आहे. वाघोली पाणीपुरवठा योजनेअंतर्गत होणारा पाणीपुरवठा काही ठिकाणी सध्या दिवसाआड करण्यात येत आहे. हे पाणीही सध्या अपुरे पडत आहे. त्यामुळे या भागात पुणे महापालिका अन्य स्त्रोतांमधून पाणीपुरवठा करण्यास सक्षम नाही. त्यामुळे वाघोली पाणीपुरवठा योजना पिंपरी महापालिकेस हस्तांतरण करणे सध्या तरी शक्य नाही, असे पुणे महापालिका आयुक्त कुणालकुमार यांनी पिंपरी महापालिका आयुक्त श्रवण हार्डीकर यांना पत्राद्वारे कळवत पाणी योजना हस्तांतरण करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.