अजिंक्यतारा, कास तलाव आणि किल्ले वासोटाची जंगल पदभ्रमंती…

(स्वप्नील घोलप )

एमपीसी न्यूज- साद घालती सह्याद्रीची गिरी शिखरे!

                     आपणही त्यांच्या सानिध्यात जाऊ रे !!

पावसाळा संपला रे संपला, की लगेच सह्याद्रीच्या पर्वत रांगा आपल्या स्वागतासाठी तयार असतात. एक नवीन लावण्यरूप धारण करून त्या पर्वतरांगा गिर्यारोहकांचा वेध घेत असतात. अशाच पर्वणीची संधी घेत शिवराष्ट्र हायकर्सने 11,12 नोव्हेंबर रोजी ऐतिहासिक वारसा लाभलेला किल्ला अजिंक्यतारा, सौंदर्याने नटलेले कासतलाव आणि कोयनेच्या मागुन डोकावत असलेला वासोटा किल्ला पदभ्रमणाची मोहीम आखली. या मोहिमेत विविध वयोगटातील, विविध क्षेत्रात काम करणारे सुमारे 150 ते 200 निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

म्हणतात ना, जो निसर्गावर प्रेम करतो, त्याला निसर्ग नेहमीच वेगवेगळे सौंदर्य दाखवून आपल्याकडे आकर्षित करत असतो. ठरल्याप्रमाणे आम्ही सर्वजण 11 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी 10 वाजता सातारा येथील तालीम संघ मैदानावर जमलो. सर्वांनी शिवराष्ट्र हायकर्सचेे प्रवेश फॉर्म भरले होते. त्यानंतर शिवराष्ट्रचे अध्यक्ष, दुर्गअभ्यासक प्रशांत साळुंखे यांनी सर्वांची ओळख करून देऊन मोहिमेची रूपरेषा सांगितली.

छत्रपती शिवरायांना मानवंदना देऊन नारळ फोडून मोहिमेचा श्रीगणेशा करण्यात आला. सकाळी 11 वाजता साताऱ्यामधील किल्ला अजिंक्यताराकडे कूच केली. आमच्या सोबत वेगवेगळ्या क्षेत्रातील बरेच काही नामवंत व्यक्तिमत्व होते. यामध्ये डॉक्टर्स, वकील, आयुक्त, कॅप्टन, विद्यार्थी, दुर्गप्रेमी आणि काही नामवंत गिर्यारोहक आदींचा समावेश होता.

घाटमाथा चढून गेल्यानंतर आम्ही सर्वजण अजिंक्यतारा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराशी पोहोचलो. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीचा स्पर्श आम्हाला जाणवणार यामुळे सर्वांची नजर अजिंक्यतार्‍याकडेे लागली होती. सर्वांनी मुख्य दरवाजातून प्रवेश केला. किल्ला जेमतेम 300 मीटर उंचीचा आणि 600 मीटर लांबीचा आहे. किल्ल्यावर पाहण्यासाठी प्राचीन काळातील ऐतिहासिक राजवाडा, दक्षिण दरवाजा आणि महादेवाचे मंदिर आहे. मंदिराचे काम गतकाळात केलेले दिसले पण महादेवाची पिंड ही प्राचीन काळातील जशीच्या तशीच आहे. हाच किल्ला आपल्या स्वराज्याची चौथी राजधानी होता, तसेच शिवरायांनी शेवटच्या काळात आजारी असताना येथेच दोन महिने विसावा घेतला होता. सर्व प्राचीन अवशेषांचे चित्रीकरण करून आम्ही खाली उतरलो आणि कास तलावाच्या दिशेने मार्गस्थ झालो.

दुपारचे जेवण आम्ही कास तलावच्या काठी बसून केले. भोजन आटोपताच सर्वांनी अथांग पसरलेल्या कास तलावाच्या निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद घेतला. त्यानंतर आम्ही बामणोलीकडे निघालो. आमचा मुक्काम हा बामणोलीजवळ होता. सर्वजण तिथे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पोहोचलो. हवेत गारवा जाणवत होता.

गरमागरम फक्कड चहा घेतल्यानंतर ताजेतवाने झालो. त्यानंतर सर्वानी कोयनेच्या अथांग जलाशयात स्कूटर बोटींगचा आनंद लुटला. संध्याकाळ झाली आणि थंड वारा कानाभोवती पिंगा घालू लागला. जणू तो सांगत होता की ‘तुम्ही आज माझ्या सानिध्यात आला आहात. थंडी वाजेल, जरा जपून ! ‘ सर्वांनी गरम कपड़े अंगावर घालून त्या निसर्गमय वातावरणात तंबू ठोकले. रात्री सर्वांनी स्वादिष्ट जेवणाचा आनंद घेतला आणि लवकरच सर्वजण तंबूमध्ये परतले.
दिवसभर दमलेले असल्याने आणि सकाळी उठून पुन्हा मोहिमेस लवकर सुरवात करायची असल्याने सर्वजण झोपी गेले.

12 नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजता उठून सर्वांनी प्रातर्विधी आटोपून बामणोलीच्या दिशेने रवाना झालो. दीड तास एका मोठ्या लॉन्चमधून प्रवास करीत आम्ही किल्ले वासोट्याच्या पायथ्याला पोहोचलो. प्रशांत सरांनी किल्ला वासोटा बद्दलची माहिती देत ट्रेकर्स मंडळींनी काय सावधानता बाळगायची ह्या बद्दल मार्गदर्शन केले.

वासोटा हा पूर्णपणे जंगलात वसलेला किल्ला आहे. तिथे वेगवेगळ्या जंगली प्राण्यांचा वावर असतो. सध्या हा किल्ला फोरेस्ट डिपार्टमेंटच्या अधिपत्याखाली आहे. किल्ला चढतानाच श्री मारुतीरायाचे मंदिर आहे. पूर्ण चढण ही दाट जंगलातूनच आहे. दगडगोटे तुडवत सर्व गिर्यारोहक वाट चालत होते, मधेच पक्ष्यांचा किलबिलाट, जंगली जनावरांचा आवाज, कोकिळेचा मनमोहक सूर मोहून घेत होता. किल्ला फार अवघड नाहीये, गिर्यारोहकांस हा किल्ला काहीच वाटत नाही.. पूर्णपणे जंगलात आणि समुद्रसपाटीपासून जेमतेम 4267 फूट उंचीचा हा किल्ला आहे. मात्र या किल्ल्याकडे जाणारी वाट जंगलातून जात असल्यामुळे एकटे-दुकटे जाणे धोक्याचे आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची नजर सुरवातीच्या काळात ह्या किल्ल्यावर गेली नव्हती. परंतु पन्हाळगडच्या वेढ्यात अडकले असताना महाराजांच्या आदेशानुसार हा किल्ला 6 जुन 1667 रोजी स्वराज्यात सामील झाला. किल्ल्यावर वरती प्राचीन काळातील मारुतीरायचे मंदिर आहे त्याचप्रमाणे एक राजवाडा आहे, पाण्याची टाकी किल्ल्यावर पहायला मिळतात. समोरच नागेश्‍वर सुळका जणू किल्ला वासोट्याला आलिंगन घेण्यास आतुर झालेला दिसतो. पुढे बाबू कड़ा आहे अतिशय खोल दरी ह्यावरून दिसून येते.

आम्ही किल्ल्यावर आपला मानाचा भगवा ध्वज फडकवला शिवरायाना आणि सर्व मावळ्यांना मानवंदना दिली. सोबत आणलेले पॅक लंच घेतले. किल्ल्यावर कोणताही कचरा होणार नाही ह्याची दक्षता घेतली. संध्याकाळी सर्वजण किल्ले वासोटा उतरणीला लागले. पुन्हा वासोटा पायथा ते बामणोली बोटिंगचा प्रवास करीत सर्वजण सुखरूप पोहोचलो. रात्रीचे जेवण घेऊन सर्वानी एकमेकांचा निरोप घेऊन आपआपल्या वाटेने मार्गस्थ झालो. ह्या दोन दिवसाच्या ट्रेकमध्ये सर्वांना निसर्गाशी मैत्री करायला मिळाली. जंगल भ्रमंती आणि इतिहास अभ्यासायला मिळाला.

मित्रानो ट्रेकमुळे आपल्याला आलेली मरगळ निघून जाते. खूप काही प्रेरक शक्ती आपल्याला ह्यातून मिळत असते. नियमित ट्रेक करणारी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम होते. ऐतिहासिक वारसा जपण्याची संधी आपणास मिळते. स्वराज्यासाठी आपल्या पूर्वजांनी सांडलेलेे रक्त ह्या सह्याद्रीत आपल्याला पहायला मिळते. ह्याच सह्याद्रीने, सह्याद्रीच्या पर्वतरांगानी आणि एका एका दगडांने छत्रपती शिवराय आणि छत्रपती शंभूराजे ह्यांना साथ दिली म्हणूनच तर स्वराज्य अजूनही बळकट आहे. आपल्याला लाभलेला हा वारसा पुढे न्यायचा असेल सह्याद्री पर्वतरागांचे, किल्ल्यांचेे जतन करा, वेळोवेळी भेट द्या !!

चार वर्षाच्या चिमुरडीने केले दोन किल्ले सर

या मोहिमेत नवी मुंबईच्या राजनंदिनी स्वप्नील घोलप या चार वर्षाच्या मुलीने सर्वांच्या बरोबरीने उत्साहात दोन दिवसात दोन किल्ले सर केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि मावळयांचा आदर्श समोर ठेवून तिने स्वराज्याची चौथी राजधानी असलेला किल्ला अजिंक्यतारा हा सर केला. दीड तास पाण्यात बोटिन्ग करून, समुद्रसपाटी पासून 4267 फूट उंचावर असणारा वासोटा किल्ला तिने स्वतः चढून सर करून स्वराज्याचा भगवा ध्वज किल्ल्यावर फडकवला.

ही मोहीम पूर्ण झाल्यावर तिच्या चेहऱ्यावरील आनंद हा खूप बघण्यासारखा होता. राजनंदिनीचा सर्व पाल्याना आणि मित्र परिवाराला एकच संदेश आहे की, महाराजांनी आपल्यासाठी जे केले आहे, ते आपण कधी विसरता कामा नये. प्रत्येकाने असेच महाराजांचे किल्ले पहावे आणि जतन करून ठेवावेत. जेणेकरून सर्व पिढ्यांना त्यापासून प्रेरणा घेता येईल.

"WhatsApp

"WhatsApp

"WhatsApp

"WhatsApp

"WhatsApp

"WhatsApp

"WhatsApp

"WhatsApp

"WhatsApp

"WhatsApp

"raj"

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.