Pune : पालिका शाळांतील विद्यार्थी वाहतुकीसाठी अवघे 72 लाख

एमपीसी न्यूज – पुणे पालिकेच्या शिक्षण विभागातर्फे पुरविली जाणाऱ्या विद्यार्थी वाहतूक सेवेसाठी या वर्षीच्या अंदाजपत्रकात अवघे 72 लाख मंजूर करण्यात आले आहेत. परिणामी वाहतूक व्यवस्था नसल्याने विद्यार्थी शाळांना दांडी मारत असून त्याचा परिणाम त्यांच्या शिक्षणावर होणार आहे.

महापालिकेच्या शाळांपासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी शिक्षण विभागातर्फे विद्यार्थी वाहतूक सेवा पुरवली जाते. या सेवेअंतर्गत महापालिकेच्या शाळांपासून एक किलोमीटर दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शाळाप्रवासासाठी वाहन व्यवस्था केली जात होती. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यामागे ठराविक प्रवासभत्ता उपलब्ध करून दिला जात होता.

गतवर्षीच्या 2016-17 च्या अंदाजपत्रकात विद्यार्थ्यांच्या वाहतूक सेवेपोटी तब्बल दोन कोटी 10 लाखांची तरतूद उपलब्ध करून देण्यात आली होती. यंदाच्या अंदाजपत्रकात मात्र, या तरतुदीला कात्री लावत अवघे 72 लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या अल्प तरतुदींमुळे यंदा शाळेपासून 1 ते 3 किलोमीटर परिसरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना वगळून केवळ तीन किलोमीटर बाहेरच्या परिघातील विद्यार्थ्यांनाच वाहतूक सुविधा पुरविण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला.

त्यानुसार, शिक्षण विभागाने शाळांकडून जुन-जुलैमध्ये माहिती मागवून त्यानुसार विद्यार्थ्यांच्या प्रवासभत्त्यास मान्यता दिली आहे त्यामुळे विद्यार्थी शाळेला दांडी मारत असून त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर आणि पर्यायाने पटसंख्येवर होईल, अशी भीती काही शाळांचे मुख्याध्यापक व्यक्त करत आहेत. विद्यार्थी वाहतूक सेवेसाठीच्या निधीत वाढ करण्याची मागणी केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.