Pune : हायर इंडिया’च्या पहिल्या इंडस्ट्रियल पार्कचे रांजणगाव येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

एमपीसी न्यूज- होम ॲप्लायन्सेस व कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील जागतिक आघाडीच्या, तसेच सलग आठव्या वर्षी मेजर ॲप्लायन्सेस क्षेत्रात जगाचा क्रमांक एकचा ब्रँड ठरलेल्या ‘हायर’ने देशातील आपल्या पहिल्या इंडस्ट्रियल पार्कचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

यावेळी ‘हायर ग्रुप’चे कार्यकारी अध्यक्ष लियांग हाइशान, ‘हायर ॲप्लायन्सेस इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक साँग युजून आणि अध्यक्ष एरिक ब्रिगॅन्झा चीनचे मुंबईतील महावाणिज्यदूत झेंगश्वुआन, भारतातील चीनी दूतावासाचे आर्थिक व वाणिज्य सल्लागार ली बाइजुन व चीनच्या मुंबईतील महावाणिज्य दूतावासाचे आर्थिक सल्लागार वाँग शिकाइ आदी उपस्थित होते.

पुण्याजवळ रांजणगाव येथे सुरु झालेला हा प्रकल्प ‘हायर’चा देशातील पहिलाच इंडस्ट्रियल पार्क आहे. केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ धोरणाशी सुसंगती राखत यासंबंधीचा सामंजस्य करार ‘हायर ग्रुप’ व महाराष्ट्र सरकार यांच्यात वर्ष 2015 मध्ये झाला होता आणि पाठोपाठ वर्ष 2016 मध्ये भूमिपूजन समारंभही पार पडला. ‘हायर इंडिया’ने या प्रकल्पाच्या विस्तारासाठी एकूण 600 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. हा इंडस्ट्रियल पार्क कार्यान्वित झाल्याने ‘हायर’ची रेफ्रिजरेटर उत्पादनाची क्षमता दुप्पटीपेक्षा अधिक वाढून 18 लाख युनिट्सपर्यंत पोचेल, तसेच एलईडी टीव्ही, वॉशिंग मशिन्स, वॉटर हीटर्स व एअर कंडिशनर्स अशा नव्या उत्पादन श्रेणीही सादर होतील. इंडस्ट्रियल पार्कमुळे ‘हायर’ला वर उल्लेखलेल्या उत्पादनांची एकूण 38 लाख युनिट्स तयार करणे शक्य होईल.

उत्पादन क्षमतेतील वाढीबरोबरच हा प्रकल्प महाराष्ट्र राज्यात रोजगार संधीही निर्माण करेल. म्हणजेच या कारखान्यातील सध्याच्या कर्मचारीवर्गात 2000 जणांची भर पडेल. आणि 10000 अप्रत्यक्ष रोजगार संधी निर्माण करणार आहे.

वर्ष 2015 मध्ये ‘हायर इंडिया’ला देशाच्या अर्थव्यवस्थेतील प्रगतीत योगदान देण्यासाठी कन्झ्युमर ड्युरेबल श्रेणीत प्रतिष्ठेचा ‘मेक इन इंडिया ॲवॉर्ड्स फॉर एक्सलन्स’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “हा इंडस्ट्रियल पार्क उत्पादन शुभारंभासाठी सज्ज झाल्याचे बघून मला अत्यंत आनंद झाला आहे. महाराष्ट्राच्या औद्योगिक गुंतवणुकीवर या घटनेचा सकारात्मक परिणाम घडून येईल, असा मला ठाम विश्वास आहे. राज्य सरकारच्या दृष्टीने हायरसारखे इंडस्ट्रियल पार्क जमीन व पायाभूत सुविधांच्या विकासासह मोठ्या अर्थव्यवस्था देऊ करेल. त्यांची औद्योगिक विकासात मदत होईलच, परंतु रोजगार निर्मिती आणि सामाजिक पायाभूत सुविधा निर्मितीतही योगदान मिळेल”

‘हायर ग्रुप’चे कार्यकारी अध्यक्ष लियांग हाइशान म्हणाले, “हायर ग्रुपसाठी भारत ही सर्वाधिक व्यूहात्मक बाजारपेठांपैकी एक आहे. या बाजारपेठेचे सुप्त सामर्थ्य लक्षात घेता येथे सातत्यपूर्ण गुंतवणूक करणे, स्थानिक त्रिस्तरीय व्यूहरचना सखोल राबवणे, प्रतिसादात्मकतेत वाढ करणे आणि ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करणे आमच्यासाठी आवश्यक होते. महाराष्ट्र हे भारतातील सर्वाधिक स्पर्धात्मक राज्यांपैकी असून त्याची औद्योगिक पातळी उच्च आहे आणि आर्थिक आवाकाही अग्रेसर आहे. या पार्श्वभूमीवर आमच्या नव्या इंडस्ट्रियल पार्कमधून निर्माण होणारा सहयोगात्मक विकास आणि संधींबाबत आम्ही अत्यंत आशावादी आहोत ”

‘हायर इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक साँग युजून म्हणाले, “हायरसाठी भारत ही एक प्रमुख बाजारपेठ असून आम्ही गेल्या 13 वर्षांत येथे लक्षणीय वेगाने प्रगती साधली आहे. वर्षानुवर्षे आशादायक प्रगती होण्यातूनच भारतीय बाजारपेठेतील सुप्त सामर्थ्य प्रतित होते आणि या प्रगतीनेच आम्हाला देशात कामकाजाचा विस्तार करण्याची संधी मिळवून दिली आहे. या निर्मिती प्रकल्पाने भारतात आमचे पाऊल भक्कम करणारा पाया घातला आहे”

‘हायर इंडिया’चे अध्यक्ष एरिक ब्रिगॅन्झा म्हणाले, “पुण्यातील आमच्या सध्याच्या उत्पादन प्रकल्पाचा विस्तार आमच्या पहिल्या इंडस्ट्रियल पार्कमध्ये करण्याची सुरवात वर्ष 2015 मध्ये झाली आणि आज त्या ध्येयपूर्तीच्या क्षणाचा साक्षीदार ठरणे आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचे आहे. केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ धोरणाशी सुसंगती राखून आम्ही स्थानिक पातळीवर सर्व श्रेणीतील उत्पादने बनवण्यासाठी 600 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. हा कारखाना सुरु झाल्याने केवळ उत्पादन क्षमतेतच वाढ होणार नसून आयातीवरील एकंदर अवलंबित्व कमी होणार आहे आणि त्याचवेळी नजिकच्या भविष्यात भारतातून निर्यातीतही वाढ होणार आहे”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.