Nagpur Earthquake : नागपूरमध्ये सहा दिवसात चौथा भूकंपाचा धक्का

एमपीसी न्यूज – नागपूर जिल्ह्यात मागील सहा दिवसात चौथा भूकंपाचा धक्का ( Nagpur Earthquake ) बसला आहे. भूकंपाची तीव्रता कमी असली तरी एकापाठोपाठ होणाऱ्या या भूकंपामुळे प्रशासन सर्व बाजूंनी पडताळणी करत आहे. खाणीत होणाऱ्या ब्लास्टमुळे अशा प्रकारचे भूकंप होत असल्याचा भूगर्भशास्त्रज्ञांचा अंदाज आहे.

 

तीन मे रोजी पहाटे 3.11 वाजता भूकंपाचा पहिला हादरा बसला. याचे केंद्र पारशिवनी, हिंगणा होते. तर याची तीव्रता 2.5 रिश्टर स्केल एवढी होती. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी चार मे रोजी पहाटे 2.24 वाजता दुसरा हादरा बसला. कुही तालुक्यात केंद्र असलेल्या या भूकंपाची तीव्रता 2.4 रिश्टर स्केल होती.

Loksabha Election : मतदान वाढीसाठी सहकार विभागाचा विशेष प्रयत्न

 

सलग तिसऱ्या दिवशी भूकंप झाला. पाच मे रोजी पहाटे 2.28 वाजता 2.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. याचे केंद्र उमरेड तालुका होते. त्यानंतर दोन दिवसाच्या अंतरानंतर 8 मे रोजी पहाटे 3.59 वाजता पुन्हा भूकंपाचा हादरा बसला. कामठी, कोराडी केंद्र असलेल्या या भूकंपाची तीव्रता 2.4 रिश्टर स्केल एवढी होती.

 

नागपूर जिल्ह्यातील हे भुकंप अतिशय सौम्य प्रकारचे आहेत. यातून कोणतीही हानी होणार नाही. नागपूर झोन पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याची काहीच गरज नाही. सावधगिरीचा उपाय म्हणून थोडीफार खबरदारी अवश्य घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

वारंवार होत असलेल्या भुकंपाच्या नोंदीमुळे संपूर्ण जिल्ह्याची सुक्ष्म भुकंप तपासणी व अभ्यास करण्यासाठी भारतीय भुवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाला सांगण्यात आले ( Nagpur Earthquake ) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.