America : ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणा-या म्युझिअम्सचा माहोल डोळ्यात खरोखरच पाणी आणतो…

America- Travelogue – (श्रीराम कुंटे – भाग 3)  
 
​एमपीसी न्यूज – 

आधीच्या लेखात म्हणल्याप्रमाणे आमचा प्रवासाचा दुसरा टप्पा वॉशिंग्टन डी  सी पासून सुरू झाला. एअरपोर्टवर एका सत्तरीच्या तरुण स्वयंसेविकेने आमच्या होस्टेलपर्यंत कसं जायचं याचं उत्तम मार्गदर्शन केलं. इथे अनेक ज्येष्ठ नागरिकांचा वेळ जात नाही आणि त्यांचं त्यांच्या गावावर नितांत प्रेम असतं म्हणून ते एअरपोर्टवर, रस्त्यावर आणि इतरत्र उत्साहाने स्वयंसेवकांचं काम करतात.  

हॉस्टेलकडे जायला उबर केली. स्थानिक राजकारण, खाण्याच्या उत्तम जागा आणि अपरिचित प्रेक्षणीय स्थळांबद्दल जाणून घ्यायचं असेल तर ड्रायव्हरला बोलतं करण्याइतका उत्तम मार्ग दुसरा नाही असा माझा अनुभव आहे. त्यामुळे मी डोनाल्ड ट्रम्पचा विषय काढला. ड्रायव्हर कृष्णवर्णीय होता. त्यामुळे तो डेमोक्रॅट समर्थक असेल हा माझा अंदाज खरा ठरला. (आपल्याकडे उच्चवर्णीय, व्यापारी, आर्थिक उदारीकरणानंतर समृद्धी आलेले हे सर्वसाधारणपणे भाजप समर्थक असतात त्याचप्रमाणे अमेरिकेत कृष्णवर्णीय, लॅटिन अमेरिकन आणि हिस्पॅनिक्स सर्वसाधारणपणे डेमोक्रॅट समर्थक असतात.) डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्यामुळे त्याला खरोखरच धक्का बसला होता. 

या माणसामुळे अमेरिकेचा सध्या अतिशय वाईट काळ चालू आहे असं पोटतिडिकीनं सांगून त्यानंतर प्रवासाचा एक तास तो अमेरिका कशी दुभंगू लागलीय, कृष्णवर्णीय अजूनही परिघाबाहेर कसं जगताहेत, त्यांच्या भर शहरातल्या वस्त्यांमधून त्यांना कसं हुसकावून तिथे टोलेजंग इमारती बांधल्या जातायत, त्यांच्या शाळांचं अनुदान बंद करून त्यांच्या मुलांना कसं गुन्हेगारीकडे वळवलं जातंय वगैरे गोष्टी तो सांगू लागला. मुलांना मुद्दामहून गुन्हेगारीकडे वळवलं जाणं हे थोडंसं विचित्र वाटलं म्हणून ट्रम्पचा विषय बाजूला ठेवून थोडंसं खोलात गेलो तर सध्या अमेरिकेत तुरुंगांचं खासगीकरण केलं जातंय अशी धक्कादायक बातमी कळली. खासगी उद्योग म्हणल्यावर फक्त फायदा बघितला जाणार आणि जर कैद्यांच्या संख्येनुसार सरकारकडून अनुदान मिळणार असेल तर कैद्यांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार हे उघडच आहे नाही का? त्याच्या म्हणण्यानुसार अनेक कृष्णवर्णीयांना मुद्दामहून कच्चे कैदी म्हणून वर्षानुवर्षं तुरुंगात खितपत ठेवलं जातंय. भांडवलशाहीचा हा एक नवाच कराल चेहरा बघायला मिळाला. पण याबद्दल पुढच्या लेखात सविस्तर बोलूच.     

वॉशिंग्टन शहर अतिशय टुमदार आणि मुख्यतः सरकारी कार्यालयांनी वसलेलं आहे. येथील जुन्या ऐतिहासिक इमारतींचं सौंदर्य नष्ट होऊ नये म्हणून उंच इमारतींना परवानगी नाहीये. अमेरिकेचा इतिहास खरंतर इनमीन पाचशे वर्षांचा पण त्यांनी तो ज्या प्राणपणाने जपून ठेवलाय त्याला तोड नाही. वॉशिंग्टनमधली प्रत्येक इमारत, प्रत्येक रस्ता त्यांनी आठवणींनी जणू जिवंत केलाय. इथे स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशन नावाच्या १८४६ साली स्थापन झालेल्या संस्थेची १९ म्युझियम्स आहेत. ही संस्था म्हणजे एक अजबच प्रकरण आहे. अमेरिकन सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या या संस्थेचा हेतू हा ज्ञानाचा प्रसार आणि प्रचार करणं असा आहे त्यामुळे यांची सर्व म्युझियम्स आपल्याला एकही पैसा न देता बघता येतात. म्युझियम्सचे विषय तरी किती? म्युझियम ऑफ स्पेस, नॅचरल हिस्टरी, अमेरिकन हिस्टरी, आफ्रिकन आर्टस्, नेटिव्ह इंडियन्स, आर्टस् अँड कल्चर अशी एक ना अनेक म्युझियम्स या शहरात आहेत. एकेक म्युझियम व्यवस्थित बघायला २ दिवस लागतील इतका त्यांचा प्रचंड आवाका असतो. प्रत्येक मुझियममध्ये ऑडिओ व्हिडीओ मार्गदर्शनाची उत्तम व्यवस्था, उत्साहाने स्वयंसेवकाचं काम करणारे ज्येष्ठ नागरिक, शाळांच्या आलेल्या ट्रिप्स, अपूर्व आनंदात हा सर्व ठेवा बघणारे विद्यार्थी, सगळीकडे फोटो काढायला मुक्त परवानगी असा हा माहोल डोळ्यात खरोखरच पाणी आणतो. 

रात्री जेवायला आम्ही चायना टाऊनमध्ये गेलो. अमेरिकेच्या प्रत्येक मोठ्या शहरात चायना टाऊन हा भाग असतोच. इथे आल्यावर तुम्हांला तुम्ही अमेरिकेत आहेत की चीनमध्ये असा प्रश्न पडेल. सगळीकडे ड्रॅगनची सजावट, चिनी संगीत, चिनी भाषेतले बोर्ड्स असं सबकुछ चिनी वातावरण. हृदय जिंकण्याचा मार्ग पोटातून जात असल्याने अमेरिकेत चीनचा सांस्कृतिक दबदबा वाढवण्यात या चायना टाऊनचा मोठा हात असावा. सर्व शहरांमध्ये भारतीय रेस्टॉरंट्स बरीच दिसली तरीही इंडिया टाऊन कुठेही दिसली नाहीत हे आवर्जून सांगण्यासारखं. दुसऱ्या दिवशी अमेरिकेच्या सामर्थ्याचं प्रतिक असणाऱ्या कॅपिटॉल आणि व्हाईट हाऊस येथे गेलो. खरं तर आपल्या राष्ट्रपती भवनापुढे व्हाईट हाऊस अगदीच सामान्य वाटतं पण सत्तेपुढे शहाणपण नाही हेच खरं. 

परीटघडीचं, उच्चभ्रू वॉशिंग्टन कसं वाटलं ? आपल्या एखाद्या धनाढ्य नातेवाईकाकडे नातं असलं तरीही आपण सोफ्यावर पाय वर घेऊन बसू नाही शकत आणि बशीतून चहा प्यायलो तर सगळे हसतील अशी भीती वाटते. का कोण जाणे, वॉशिंग्टन या अशा धनाढ्य नातेवाइकासारखं वाटलं.

"america

"america

"america

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.