अमेरिकेतील जादुई शहर न्यूयॉर्क !

90

(श्रीराम कुंटे)

HB_POST_INPOST_R_A

अमेरिका ट्रॅव्हलॉग-भाग 4

एमपीसी न्यूज- न्यूयॉर्क. या शहरात नक्कीच काहीतरी जादू असावी. म्हणूनच जगभरातले लोक या शहरात नशीब काढायला येतात. न्यूयॉर्क हे किती जागतिक शहर आहे याचा आवाकाच आपल्या लक्षात येत नाही. या शहरातील 40 टक्के लोकसंख्या अमेरिकेबाहेर जन्म झालेल्या लोकांची आहे आणि इथे तब्बल 200 देशांचे नागरिक राहतात. संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक मुख्यालयासाठी याहून अधिक योग्य कुठलं शहर असेल का ?

या अशा न्यूयॉर्क शहरात आम्ही जाणीवपूर्वक युथ होस्टेलच्या एका होस्टेलवर राहिलो. युथ हॉस्टेल ही एक भन्नाट कल्पना आहे. देशोदेशीच्या भटकंतीप्रेमी युवक युवतींना कमी खर्चात राहता यावं या म्हणून बांधलेल्या या युथ हॉस्टेल्समध्ये सामायिक स्वयंपाकघर, वॉशिंग रूम्स, गेम रूम्स, टिव्ही रूम लायब्ररी यांसारख्या अतिशय उत्तम सोयी तर असतातच पण खरं आकर्षण तिथे भेटणारे सहप्रवासी हेच असतं. आम्ही तिथे असताना चिले आणि अर्जेंटिना या दक्षिण अमेरिकन देशांमधून आलेल्या काही तरुण तरुणींशी छान मैत्री झाली. अर्जेंटिना आणि चिले या देशांमध्ये योगाचं भयंकर वेड आहे आणि सकाळी पार्कमध्ये गटागटांनी लोक योगाभ्यास करतात असं त्यांनी सांगितल्यावर मी चकितच झालो. तुम्ही कुठल्या योगाचा अभ्यास करता असं विचारल्यावर त्यांनी अस्खलितपणे अष्टांग योग असं उत्तर दिलं. कुठल्याही देशाचा दीर्घकालीन टिकणारा प्रभाव हा सामरिक किंवा आर्थिक शक्तीमुळे असतो त्याहूनही जास्त तो सांस्कृतिक ताकदीमुळे असतो असं मला वाटतं. भारताकडे प्रचंड मोठी अशी सांस्कृतिक ताकद आहे जी परदेशीयांकडे नाहीये. पण दुर्दैवाने या सांस्कृतिक ताकदीचं उत्तम मार्केटिंग करण्यात(अमेरिकन भाषेत लॉबीईंग)आपण फारच मागे पडतो. आपल्या देशाबद्दल किती अज्ञान आहे याबाबतच घडलेला एक किस्सा सांगतो. एका कॉफी शॉप मध्ये आम्हाला एक वयस्कर भारतप्रेमी अमेरिकन जोडपं भेटलं. दोघांनाही भारताबद्दल खूप आकर्षण होतं त्यांच्याशी गप्पा मारायला लागल्यावर त्यांनी भारताबद्दल प्रश्न विचारायला सुरुवात केली. भारतात फक्त हिंदूच राहतात. श्रीलंका हा भारताचाच भाग आहे अशी त्यांचं कल्पना होती. आपल्याकडे आता उच्च तंत्रज्ञान आहे याबद्दल त्यांना आश्चर्य वाटत होतं आणि भारतीय ट्विटरसुद्धा वापरतात हे कळल्यावर तर त्यांना धक्काच बसला. आहे की नाही गंमत ?

यूयॉर्क मध्ये बघण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत पण मला सगळ्यात जास्त भावलेली ठिकाणं म्हणजे सेंट्रल पार्क आणि स्ट्रॅन्ड हे जगातलं सगळ्यात मोठं पुस्तकांच दुकान. न्यू यॉर्क शहराच्या मध्यभागी वसलेल्या सेंट्रल पार्कचा आकार 843 एकर एवढा प्रचंड आहे. या पार्कमध्ये गेल्यावर तुम्ही शहरात आहेत हाच विसरायला होतं. उत्तम ट्रेल्स, सायकलिंग ट्रॅक आणि सरोवरांनी नटलेल्या या पार्कमध्ये फिरण्यासाठी सायंकाळी भाड्याने मिळतात.

वाचन कमी होण्याच्या, डिजिटल आक्रमणाच्या काळात 200 कर्मचारी आणि 25 लाख पुस्तकं असलेल्या(ही पुस्तकं एकमेकांना लागून ठेवल्यास त्यांची लांबी 18 मैल भरेल) स्ट्रॅन्डला भेट दिल्यावर आपल्या आजूबाजूला सगळंच काही निराशाजनक नाहीये याची लक्खपणे जाणीव होते. या वर्षी 91 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या स्ट्रॅन्डला दर वर्षी लाखो वाचनप्रेमी भेट देतात. तुम्ही आवडलेलं पुस्तक कितीही वेळ वाचत बसू शकता आणि इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चक्क पुस्तकांबद्दल एक परीक्षा द्यावी लागते.

तर अशा या बहुरंगी, बहुढंगी न्यूयॉर्कमध्ये प्रत्येकासाठी काही ना काही आहे. काही ठिकाणं तुम्हांला खूप आवडतील तर काही अजिबातच आवडणार नाहीत. पण जर तुम्हांला वेगवेगळी माणसं वाचायची आवड असेल तर मात्र न्यू यॉर्कसारखं दुसरं ठिकाण नाही.

.

HB_POST_END_FTR-A1
%d bloggers like this: