Talegaon : गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाने पोलीस ठाण्यात जाऊन दिली घटनेची माहिती

एमपीसी न्यूज – तळेगाव मधील भेगडे आळी येथे मंगळवारी (दि. 23) रात्री एका तरुणावर(Talegaon) गोळीबार झाला. यामध्ये तरुणाच्या खांद्याला गोळी आरपार गेली. गोळीबार झाल्यानंतर जखमी तरुणाने जखमी अवस्थेत पोलीस ठाण्यात जाऊन स्वतः घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांची धावपळ सुरू झाली.
आदित्य गणेश भेगडे (वय 27, रा. भेगडे आळी, तळेगाव दाभाडे, ता. मावळ) असे(Talegaon) जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तीन अल्पवयीन मुलांच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आदित्य भेगडे याचे सहा महिन्यांपूर्वी एका अल्पवयीन मुलासोबत भांडण झाले होते. अल्पवयीन मुलाचा विरोधक असलेल्या एका तरुणाच्या वडिलांसोबत आदित्य फिरत असे. तसेच त्यांच्या घरी देखील आदित्यचे येणे-जाणे असायचे. यामुळे अल्पवयीन मुलाच्या डोक्यात आदित्यबाबत राग होता. दोघेजण एकमेकांना सोशल मीडियातून खुन्नस देत असत.
मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास आदित्य हा त्याच्या घरासमोर दुचाकीवर बसून मोबाइलमध्ये गेम खेळत होता. त्यावेळी 17 वर्षीय अल्पवयीन मुलगा त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांसोबत तेथे आला. आदित्य याच्याजवळ येऊन अल्पवयीन मुलाने त्याच्याकडील पिस्तुलातून आदित्य याच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी आदित्य याच्या खांद्याच्या आरपार गेली. त्यानंतर 17 वर्षीय अल्पवयीन मुलगा आणि त्याचे साथीदार पळून गेले.

खांद्याला गोळी लागल्याने आदित्य जखमी झाला. त्यानंतर त्याने जखमी अवस्थेत तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे गाठले. आपल्यावर गोळीबार झाल्याची आदित्यने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी आदित्यला रुग्णालयात दाखल केले.
जखमी आदित्य आणि गोळीबार करणारा अल्पवयीन मुलगा या दोघांवरही यापूर्वी विविध गुन्हे दाखल आहेत. गोळीबार करून पळून गेलेल्या मुलांचा तळेगाव दाभाडे पोलीस शोध घेत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.