Pune : बाळाच्या मृत्यूनंतर केईएममध्ये नातेवाईकांचा गोंधळ

हॉस्पिटलच्या निष्काळजीपणाने बाळाचा मृत्यू झाल्याचा वडिलांचा आरोप 
 
एमपीसी न्यूज – केईएम हॉस्पिटमध्ये ह्रदयाच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल केलेल्या बाळाचा गुरूवारी सकाळी आयसीयुमध्ये शस्त्रक्रिया करण्यासाठी नेत असताना मृत्यू झाला. स्टाफकडून ऑक्सिजन प्रणाली बदलताना हलगर्जीपणा झाल्यामुळे हा मृत्यू झाला असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. तर, बाळाचा मृत्यू हा ह्रदयविकाराने झाला असल्याचे हॉस्पिटलच्या प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 
 

गौतमी विनायक चौधरी (वय, 4 महिने, रा. कासेवाडी, भवानी पेठ) असे मृत बाळाचे नाव आहे. याप्रकरणी तिचे वडील विनायक चौधरी यांनी हॉस्पिटल तसेच समर्थ पोलिसांकडे तक्रार केली आहे.  
 
गौतमीला ‘टीएपीव्हीसी’ हा जन्मजात ह्रदयविकार होता. या ह्रदयविकारावर शस्त्रक्रिया करण्याचे त्यांना केईएम हॉस्पिटलमधे ह्रदयविकारतज्ज्ञांनी सांगितले होते. त्यासाठी हॉस्पिटलने अडीच लाख रुपये खर्च सांगितला होता. कुटूंबीयांनी पैसे गोळा करून जवळपास एक लाख 86 हजार रुपये जमा केले होते. तसेच जोपर्यंत पूर्ण पैसे जमा करत नाही तोपर्यंत शस्त्रक्रियेस हात लावणार नसल्याचे सांगितल्याने त्यांनी महापालिकेतील शहरी गरीब योजनेतून एक लाख रुपये निधी मिळण्यासाठी दाखला आणला. यानंतरच डॉक्टरांनी तिला शस्त्रक्रिया करण्यासाठी घेतले. अशा प्रकारे मानसिक त्रास दिल्याने आणि पैशांसाठी शस्त्रक्रिया उशिरा केल्याचाही आरोप गौतमीचे वडील चौधरी आणि त्यांचे जवळील मोहसीन नगरवाला, तसेच सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय बानखेले यांनी यावेळी केला. 
 
याबाबत केईएम हॉस्पिटलचे वैद्यकीय प्रशासनाचे प्रमुख डॉ. व्ही. येमुल यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच ह्रदयविकाराचा झटका आल्यामुळे मृत्यू झाला असल्याचे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.