Pimpri : महापालिकेतील 17 नगरसेवकांना आमदार व्हायचंय !

एमपीसी न्यूज – विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सर्वपक्षीय 17 नगरसेवकांना आमदार होण्याचे वेध लागले आहेत. त्यांनी आपल्या पक्षाकडे इच्छूक म्हणून मुलाखती दिल्या आहेत. उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेत्यांचा समावेश आहे.

पिंपरी महापालिकेतील उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेत्यांसह 17 नगरसेवकांना आमदार व्हायच आहे. त्यांनी आपल्या पक्षांकडे मुलाखती देखील दिल्या आहेत. पिंपरी मतदारसंघातून शिवसेनेचे नगरसेवक सचिन भोसले, राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर, नगरसेवक राजू बनसोडे, भाजप नगरसेवक शैलेश मोरे यांना निवडणूक लढवायची आहे. त्यांनी पक्षाकडे मुलाखती दिल्या आहेत. स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा, नगरसेविका सीमा सावळे या देखील इच्छूक आहेत. परंतु, त्या अमरावतीतून लढण्यासाठी चाचपणी करत आहेत.

चिंचवड मतदारसंघातून लढण्याची उपमहापौर सचिन चिंचवडे आणि पिंपरीगावचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी भाजपकडे इच्छा व्यक्त केली आहे. विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, मोरेश्वर भोंडवे, मयुर कलाटे यांना देखील विधानसभा लढवायची आहे. तर, शिवसेना-भाजप युती होणार असल्याने शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते राहुल कलाटे यांची अडचण झाली आहे. परंतु, त्यांच्यासह नगरसेवक निलेश बारणे विधानसभा लढविण्यासाठी इच्छूक आहेत.

भोसरीतून महापालिकेचे सभागृह नेते एकनाथ पवार, भाजयुमोचे शहराध्यक्ष नगरसेवक रवी लांडगे इच्छूक आहेत. माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक अजित गव्हाणे राष्ट्रवादीकडून इच्छूक आहेत. तीनही विधानसभा मतदारसंघातून 17 नगरसेवकांनी विधानसभा लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यापैकी कोणाला उमेदवारी मिळते आणि कोण आमदार होते हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.