Chinchwad : चार वर्षांपासून फरार असलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार खंडणी दरोडा विरोधी पथकाच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – चार वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा पोलीस रेकॉर्डवरील आरोपी पिंपरी-चिंचवड खंडणी दरोडा विरोधी पथकाच्या जाळ्यात अडकला. त्याच्यावर पिंपरी, चिंचवड, निगडी आणि चाकण पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तो चाकण पोलीस ठाण्यातील दरोड्याचा प्रयत्नाच्या गुन्ह्यात मागील चार वर्षांपासून फरार होता.

सुरेश उर्फ बॉबी विलास यादव (वय 35, रा. पंचतारानगर, आकुर्डी, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी दरोडा विरोधी पथक पिंपरी-चिंचवड परिसरात गस्त घालत असताना पोलीस नाईक निशांत काळे व शरीफ मुलाणी यांना माहिती मिळाली की, चाकण पोलीस ठाण्यातील दरोड्याचा प्रयत्नातील आरोपी पंचतारानगर आकुर्डी येथील छावा चौकात थांबला आहे. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून सुरेश याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याचा दरोड्याच्या प्रयत्नाच्या दोन आणि एका चोरीच्या गुन्ह्यात समावेश असल्याचे कबूल केले.

आरोपी सुरेश याच्यावर निगडी पोलीस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्यासह गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल आहेत. चिंचवड पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाच्या दोन गुन्हासह चार गुन्हे दाखल आहेत. तर पिंपरी पोलीस ठाण्यात 2014 साली त्याच्यावर दंगलीचा गुन्हा दाखल आहेत. 2015 साली आरोपी सुरेश याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात दरोड्याच्या प्रयत्नाचे दोन आणि चोरीचा एक गुन्हा दाखल आहे. 2015 पासून हा आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता. पिंपरी-चिंचवड खंडणी दरोडा विरोधी पथकाने सापळा रचून आरोपीला अटक केली.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बढे, पोलीस कर्मचारी निशांत काळे, शरीफ मुलाणी, अशोक दुधवणे, विक्रांत गायकवाड, गणेश कोकणे, सुधीर डोळस यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.