Pune : काही नागरिकांनी ‘टांगेवाला’ परिसरात मला अडवून राजकारण केले -चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – ‘पालकमंत्र्यांच्या निषेध असो’, ‘निवडणूक आली म्हणून भेटायला आले’, ‘मदत दिली नाही’, असे म्हणून टांगेवाला कॉलनी परिसरात नागरिकांनी भर रस्त्यात खाली बसून निषेध केला. याबाबत विचारले असता काही नागरिकांनी टांगेवाला कॉलनी परिसरात मला अडवून राजकारण केले, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

टांगेवला कॉलनी परिसरात नागरिकांनी तुम्हाला हुसकावून का लावले?, या प्रश्नावर पाटील म्हणाले, काही थोड्या नागरिकांनी मला अडवून, घोषणा देऊन राजकारण केले. तुम्हाला 10 मिनिटांत पळवून लावले, त्यावर तुम्ही होता का?, अशी उलट विचारणा त्यांनी पत्रकाराला केली असता, ते म्हणाले, हो मी तिथेच होतो. 1.50 ला तुम्ही आले आणि 2 वाजता नागरिकांनी तुम्हाला पळवून लावले, अशी आठवण करून दिली असता, पाटील यांनी सारवासारव केली. महापौर मुक्ता टिळक, स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे, भाजप नेते बाबा मिसाळ, नगरसेवक महेश वाबळे यांचेही लोक ऐकण्याचा मनस्थितीत नव्हते.

‘पालकमंत्र्यांच्या निषेध असो’, ‘निवडणूक आली म्हणून भेटायला आले’, ‘मदत दिली नाही’, असे म्हणून टांगेवाला कॉलनी परिसरात नागरिकांनी भर रस्त्यात खाली बसून निषेध केला. नागरिकांचा रोष बघून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 10 मिनिटांत तेथून दुसऱ्या रस्त्याने काढता पाय घेतला.

बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे आंबील ओढ्याला प्रचंड प्रमाणात पूर आला. अरण्येश्वर कॉर्नर, टांगेवाला कॉलनी भागातील नागरिकांना या पुराचा मोठा फटका बसला. अनेकांचे संसार उघड्यावर आले. पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या गाड्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या होत्या. सर्वात महत्वाचे म्हणजे या घटनेत टांगेवाला कॉलनीमधील नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे येथील नागरिकांचा संताप शिगेला पोचला होता. स्थानिक नगरसेवकांनी देखील काहीही मदत केली नसल्याचा येथील नागरिकांनी आरोप केला.

त्यामुळे येथील नागरिकांनी आज, शुक्रवारी तावरे कॉलनी चौकात रास्ता रोको करीत आंदोलन केले. या नागरिकांना भेटण्यासाठी पालकमंत्री या ठिकाणी आले असता संतप्त नागरिकांनी रस्त्यावर ठाण मांडून पालकमंत्र्यांच्या तीव्र शब्दात निषेध केला. ही घटना घडली त्यावेळी पालकमंत्री नवी दिल्लीमध्ये जागा वाटपाच्या चर्चेमध्ये मश्गुल होते. त्यांना नागरिकांना भेटण्यासाठी वेळ नव्हता अशी संतप्त प्रतिक्रिया येथील नागरिकांनी व्यक्त केली.

नागरिकांच्या संतापाचा उद्रेक पाहून चंद्रकांत पाटील वैतागले. ‘गाडी काढ, गाडी काढ’ म्हणून चंद्रकांत पाटील तेथून निघून जाऊ लागले. भाजप कार्यकर्त्यांनी मानवी साखळी करून पाटील यांना दुसऱ्या रस्त्याने पळविले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.