Chinchwad : अवैध दारू निर्मिती, विक्री करणा-यांवर कारवाई; चार लाखांचा ऐवज नष्ट

एमपीसी न्यूज – आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या विशेष पथकाने भाटनगर पिंपरी येथे अवैध दारू निर्मिती आणि विक्री करणा-यांवर धडक कारवाई केली. दीड हजार लिटर दारू, साडेपाच हजार लिटर दारू निर्मितीचे रसायन व 150 लिटर ताडी असा एकूण 4 लाख 6 हजार 960 रुपयांचा ऐवज नष्ट केला. या कारवाई दरम्यान भाटनगर परिसरात छावणीचे स्वरूप आले होते.

सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी एक विशेष पथक तयार केले आहे. या पथकाने गुरुवारी (दि. 26) भाटनगर, पिंपरी येथे अवैधरित्या हातभट्टी दारूची निर्मिती आणि विक्री करणा-यांवर धाड टाकली. या कारवाईमध्ये पोलिसांनी 1 हजार 541 लिटर दारू, 5 हजार 430 लिटर दारू निर्मितीचे रसायन व 150 लिटर ताडी असा एकूण 4 लाख 6 हजार 960 रुपयांचा ऐवज नष्ट केला.

या कारवाईमध्ये 11 जणांवर मुंबई प्रोहिबिशन अॅक्टनुसार दहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त आर आर पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, सहा पोलीस निरीक्षक, 11 सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक आणि 82 पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.