बुधवार, ऑक्टोबर 5, 2022

प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी पाच वाजता थंडावणार

एमपीसी न्यूज – महापालिका निवडणुकांच्या प्रचारासाठी आता केवळ अवघे काही तास उरले आहेत. आज संध्याकाळी पाच वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यापासून ते तळागाळातील कार्यकर्त्यांची  प्रचारासाठी धावपळ चालू आहे. वैयक्तिक गाठीभेठीवर भर दिला जात आहे.

या पार्श्वभूमीवर पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात अनेक राजकीय दिग्गजांच्या सभा आयोजित करण्यात आल्या आहेत.  राजकीय नेत्यांना पुणे, मुंबई, पिंपरी-चिंचवड अशी तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर उमेदवारांना न थकता दारादोरी जाऊन मतदानाचे दान मागावे लागत आहे. प्रचाराचे काऊंटडाऊन सुरु झाले असून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत नियोजित प्रचाराचे सर्व कार्यक्रम उमेदवारांना संपवायचे आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा  सकाळी नऊ वाजल्यापासून पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागात रोड शो होणार आहेत. निगडी येथे जाहीर सभा होणार आहे. तर  राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचीही पिंपरी-चिंचवड शहरात चार ते पाच कोपरा सभा होणार आहेत. 

राज्य निवडणूक आयोगाने प्रचारासाठी आज संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंतची मुदत दिली आहे. त्यानंतर सर्व राजकीय पक्षांचे  झेंडे, बॅनर उतरविण्यात येतील, प्रचार रॅली, सभा, भाषणेही थांबविण्यात येतील. त्यामुळे गेला महिनाभर सुरू असलेला प्रचार उद्या थंडावणार आहे. त्यानंतर मंगळवारी  दि. 21 तारखेला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या कालावधीत मतदान होणार आहे. तर मत मोजणी गुरुवारी 23 तारखेला होणार आहे. 

दरम्यानच्या काळात कोणाताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 20, 21 आणि 23 या तीन दिवशी दारू विक्रीवर बंदी घालण्यात आलेली आहे. प्रचार संपल्यानंतर वैयक्तिक भेटींवर उणेवार व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून भर दिला जाणार आहे.
spot_img
Latest news
Related news