Chikhali : सराईत गुन्हेगार मोन्या लुडेकर तडीपार 

एमपीसी न्यूज – चिखली परिसरातील सराईत गुन्हेगार मोन्या लुडेकर (Chikhali)याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. लुडेकर याने स्वतःची टोळी बनवून तो त्या माध्यमातून वेगवेगळे गुन्हे करीत असल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी आदेश दिले आहेत. 
आदर्श उर्फ मोन्या विठ्ठल लुडेकर (वय 22, रा. शरदनगर, चिखली) (Chikhali)असे तडीपार केलेल्या आरोपीचे नाव आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोन्या लुडेकर हा काहीही कामधंदा करत नाही. त्याने स्वतःची गुन्हेगारी टोळी बनवून त्या माध्यमातून चिखली परिसरात वेगवेगळे गुन्हे केले आहेत.
त्याच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात जबरी चोरी, अवैधरित्या शस्त्र जवळ बाळगणे, बेकायदेशीरपणे जमाब जमवणे, गंभीर दुखापत करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या दादागिरीमुळे चिखली परिसरात दहशत निर्माण झाली होती. त्याच्या दहशतीमुळे सर्वसामान्य नागरिक त्याला विरोध करत नसत. तसेच त्याच्याबाबत पोलिसांकडे तक्रार देखील देत नव्हते.
ही दहशत मोडून काढण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी मोन्या याच्या विरोधात तडीपारीची कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांच्याकडे सादर केला. या प्रस्तावाची गांभीर्याने दखल घेत उपायुक्त शिवाजी पवार यांनी मोन्या लुडेकर याला 1 मे 2024 रोजी दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे.

 

 

पोलिसांच्या या कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण झाली आहे. चिखली परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या या तडीपारीच्या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले आहे. चिखली परिसरात गुंडगिरी व दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर यापुढे देखील अशाच प्रकारची कठोर कारवाई करण्यात येईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉ शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे, पोलीस उपनिरीक्षक राजेश मासाळ, पोलीस अंमलदार सचिन गायकवाड, दुर्गा केदार यांनी केली.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.