चिंचवड येथे पैसे वाटण्यावरून भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये राडा; परस्परविरोधी तक्रार

एमपीसी न्यूज – पैसे वाटण्यावरून भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंचवड येथे (शनिवारी) रात्री राडा झाला. याप्रकरणी भाजपच्या उमेदवाराविरोधात दंगल माजविल्याप्रकरणी तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विजयनगर, आनंदनगर, एम्पायर इस्टेट, भाटनगर प्रभाग क्रमांक 19 भाजपचे उमेदवार शैलेश प्रकाश मोरे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार काळूराम मारुती पवार  हे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. शनिवारी रात्री पैसे वाटण्याच्या कारणावरून त्यांच्यामध्ये वादावादी झाली. त्यातून त्यांच्यात भांडणे झाली. याप्रकणी चिंचवड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद देण्यात आली असून राष्ट्रवादीचे काळूराम पवार यांच्याविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि भाजपचे उमेदवार शैलेश मोरे यांच्याविरोधात दंगल माजविल्याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे, पोलिसांनी सांगितले. 

नगरसेविका मनिषा काळूराम पवार (वय 34, रा. चिंचवड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भाजपचे उमेदवार शैलेश मोरे याच्यासह त्याच्या 15 ते 20 साथीदारांविरोधात कलम 452, 337, 323, 504, 506, 143, 148, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फिर्यादीत म्हटले आहे की,  आनंदनगर झोपटपट्टी येथे आमचे कार्यालय आहे. रात्री काही जणांनी कार्यालयावर दगडफेक केली. रविवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास शैलेश मोरे आणि त्याचे 15 ते 20 साथीदार आमच्या इमारतीतील सुरक्षारक्षकाला दमदाटी करून गेट उघडण्यास लावून आमच्या घरात घुसले. काळूराम पवार कोठे आहे. तुम्ही उद्या प्रचाराची रॅली कशी काढता बघतो. माझी मोठ्या लोकांशी ओळख आहे, अशी दमदाटी केली. तसेच जाताना कार्यकर्त्यांनी घरावर दगडफेक करून  दहशत माजिविली, असे फिर्यादीत म्हटले आहे.  

संजय हिरामण लंगोटे (वय 37, रा. गवळीचाळ, मोहननगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, काळुराम पवार, बाळू पवार, किरण तेलंग याच्यासह एकाविरोधात कलम 307, 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फिर्यादीत म्हटले आहे की, शनिवारी रात्री काळूराम पवार हे आनंदनगर येथे मतदारांना पैसे वाटप करत असल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर आम्ही तिथे गेलो होतो. त्यावेळी काळूराम पवार, बाळू पवार, किरण तेलंगे यांनी फिर्यादी  लंगोटे हे शैलेश मोरे यांचे कार्यकर्ते असून त्याच्या प्रचारार्थ फिरत असल्याचे पाहून चिडून लंगोटे याला शिवीगाळ केली. तसेच लंगोटे याच्या डोक्यात दगडाने मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला असे, फिर्यादीत नमूद केले आहे. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.