कम्युनिस्टना देशातून हाकलण्याची वेळ आता आली आहे – गिरीश बापट

एमपीसी न्यूज – अनेक वेळा मी केरळमध्ये गेलो, त्याठिकाणी राष्ट्रवादी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांची हत्या केली जाते. त्या कम्युनिस्टना देशातून हकलण्याची वेळ आता आली आहे, असे वक्तव्य गिरीश बापट यांनी आज (दि. 1 मार्च) पुण्यात व्यक्त केले.
केरळमध्ये मार्क्सवाद्यांकडून सरकारच्या पाठिंब्याने संघ व भाजप विरोधी कार्यकर्त्यांच्या नृशंस हत्याकांडाविरोधात घेतलेल्या धिक्कार सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी खासदार अनिल शिरोळे उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पार्टी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय मजदूर संघ, भारतीय किसान संघ, क्रीडा भारती, भारत भरती, पतित पावन संघटना, विश्व हिंदू परिषद इत्यादी संघटनाही सहभागी झाल्या आहेत.
गिरीश बापट पुढे म्हणाले की, देशभरात अनेकवेळा सत्तांतरे झाली, जेव्हा राष्ट्रवादाला आव्हान देणारे काही पिलावळ जेव्हा तयार होते. तेव्हा त्याला समूळ नष्ट करण्यासाठी सर्व देश एकत्र येतो, ती वेळ आता आली आहे. वैचारिक लढण्याची हिम्मत असेल तर जरूर लढा आमची त्याला तयारी असेल. जर तुम्ही एकाची हत्या कराल तर 100 कार्यकर्ते तयार होतील, अशी पार्श्वभूमी आम्ही तयार करू, केरळचे तरुण एकटे नसून संपूर्ण भारत देश त्यांच्यासोबत आहे हे सांगण्यासाठीच आजच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, असेही ते म्हणाले.
तसेच खासदार अनिल शिरोळे म्हणाले की, मागील 50 वर्षांपासून केरळमध्ये डाव्यांचा धुमाकूळ चालू आहे, स्वातंत्र्य मिळवल्यापासून संघाच्या कार्यकर्त्यांना टार्गेट करणे चालू आहे. आता केरळचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी संघाच्या कार्यकर्त्यांची हत्या केली आहे, त्या ठिकाणी कायदा सुव्यस्थेचा प्रश्न खूप गंभीर आहे. त्यामुळे मी केंद्र सरकारला विनंती करतो की, त्यांनी केरळमधील सरकार बरखास्त करावे आणि त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करावी, असेही ते म्हणाले.