कुसगावात निवडणुकीच्या वादातून दोन गटात हाणामारी

परस्पर विरोधी तक्रारीवरून 14 जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – लोणावळ्याजवळील कुसगाव या गावात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या कारणावरून मंगळवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास दोन गटात हाणामारी झाली. यामध्ये तीन जण जखमी झाले आहे. या प्रकरणी दोन्ही गटाकडून लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत.

यामध्ये स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय सदस्य व मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक नितिन रतन साळवे (वय 34) व कुसगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रवीण रतन साळवे (वय 31 रा. कुसगाव, लोणावळा) व विरोधी गटाचे अतिष राजू केदारी (वय 23, रा. कुसगाववाडी, लोणावळा) हे जखमी झाले आहेत.

नितिन रतन साळवे यांच्या फिर्यादीवरून लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात शिवसेनेचे कुसगाव ग्रामपंचायत सदस्य गबळू ठोंबरे, रवी घोंगे, किसन ठोंबरे, बाळू काळे, अमोल ठोंबरे, बाळा ठोंबरे, अजित केदारी, मनोज केदारी, विजय घोंगे व इतर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मावळ पंचायत समितीच्या निवडणुकीच्या जय पराजयातून स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे यांच्याशी रवी घोंगे व गबळू ठोंबरे यांचे वाद झाले. याची माहिती मिळताच घटनास्थळी आलेले नितिन व प्रवीण साळवे तसेच ठोंबरे समर्थक यांच्यात हाणामारी झाली. यामध्ये नितिन साळवे यांच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे. तसेच प्रवीण व दुसर्‍या गटातील अतिष केदारी हे देखील जखमी झाले आहेत.

याच प्रकरणी दुसरी फिर्याद विरोधी गटाचे अतिष राजू केदारी (वय 23, रा. कुसगावाडी) यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. या फिर्यादीवरुन स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेशभाऊ साळवे, नितिन साळवे, प्रवीण साळवे, किरण साळवे व एक अनोळखी इसम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणुकीच्या वादातून साळवे यांनी हातातील दांडके व कसल्यातरी हत्यारांनी मारहाण करत शिविगाळ व दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी तिन जणांना ताब्यात घेण्यात आले असल्याचे तपास अधिकारी व पुणे ग्रामीणचे पोलीस उप अधीक्षक बरकत मुजावर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.