ज्येष्ठाच्या खूनप्रकरणी पत्नी, जावाई ताब्यात

एमपीसी न्यूज – पेट्रोल अंगावर टाकून पेटवून देऊन ज्येष्ठ नागरिकाचा खून केल्याप्रकरणी पत्नी आणि जावायला भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना बुधवारी(दि.7) भरदुपारी अडीचच्या सुमारास नाशिक फाटा येथे घडली होती.  

पत्नी सुमन उद्धव उनवने आणि जावाई ज्ञानेश्वर जयंत महाले यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांच्याकडे कसून चौकशी करत आहेत. उद्धव आसाराम उनवणे (वय 65, रा. आळंदी, मूळ रा. नाशिक) असे मृत्यू झालेल्या जेष्ठ नागरिकाचे नाव आहे.

उद्धव उनवणे हे बुधवारी नाशिकवरुन पैसे घेऊन वल्लभनगर बस स्थानकात आले होते. वल्लभनगर स्थानकातून ते नाशिक फाट्याकडे जात होते. त्यावेळी पाठलाग करत आलेल्या तिघांनी त्यांना तुम्ही उनवनेच काय असे विचारले आणि मारहाण केली.

त्यांच्याकडील 20 हजार रुपयांची रोकड काढून घेतली आणि डोक्यावर पेट्रोल टाकून पेटवून देऊन पोबारा केला. पत्नी सुमन आणि जावाई ज्ञानेश्वर यांनीच मारहाण करायला लावले असल्याचे  फिर्यादीत नमूद केले आहे. 

यामध्ये उनवने गंभीर भाजले होते. त्यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. गुरुवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी सुमन आणि जावाई ज्ञानेश्वर यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल केला होता. शुक्रवारी त्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात येत आहे. भोसरी पोलीस तपास करत आहेत. 

दरम्यान, चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे उद्धव उनवणे यांचा खून केला असल्याचे, प्राथमिक तपासात पुढे आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.