निगडीत वाहनचोरी प्रकरणात तिघे जेरबंद

एमपीसी न्यूज – वाहनचोरी प्रकरणात तिघांना निगडी पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले. तर, एकजण पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.10) सायंकाळी साडेसातच्या सुमारास जाधववाडी, चिखली येथे करण्यात आली.

 

अजय पाल्या टाक (वय 30, बौद्धनगर, पिंपरी), जितेंद्र उर्फ बबलु गुलाब घोडके (वय 29) आणि सुनील भिवा गायकवाड (वय 23,  दोघे रा. ओटास्कीम, निगडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर, त्यांचा साथीदार मिनिनाथ विश्वंबर गायवाड (रा. अजंठानगर, निगडी) हा पसार झाला आहे. त्यांच्याकडून 70 हजार रुपये किमतीच्या तीन मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत.

 

निगडी पोलीस शुक्रवारी हद्दीत गस्त घालत होते. जाधववाडी, चिखली येथील पेट्रोल पंपाजवळ आरोपी (एमएच 14 एच 6380) या क्रमांकाची मोटार घेऊन संशयीतरित्या थांबले होते. पोलिसांनी आरोपींना हटकले असता आरोपी पळून जाऊ लागले. पोलिसांनी तिघांना पकडले. तर, त्यांचा एक साथीदार पसार झाला आहे.

 

आरोपींकडे मोटारीच्या कागदपत्रांबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. कसून चौकशी केल्यावर मोटार चोरीची असल्याची कबूली दिल्याचे, पोलिसांनी सांगितले. तसेच आणखी दोन मोटारी चोरल्या असल्याचेही आरोपींनी सांगितले.

 

पिंपरी, देहूरोड आणि चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील, असे वाहनचोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले असून 70 हजार रुपये किमतीच्या तीन मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत. निगडी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.