रमेशन यांच्या उपोषणानंतर आण्णा हजारे यांचाही राष्ट्रीय पातळीवर उपोषणाचा इशारा

देशभरातील इव्हीएम मशीन घोटाळ्या विरुद्ध करणार उपोषण


एमपीसी न्यूज –  माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजीत रमेशन यांनी पुणे विधानभवनाबाहेर निवडणूक काळात झालेल्या गोंधळाविरुद्ध  उपोषण केले होते. त्याला  सामाजिक कार्यकर्ते  आण्णा हजारे यांनी पाठिंबा दर्शविणारे पत्र दिले, यामध्ये म्हटले आहे की, निवडणुकीत  झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी, अन्यथा राष्ट्रीय पातळीवर उपोषण करण्यात येईल, असा इशाराही या पत्राद्वारे देण्यात आला आहे.

हजारे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महापालिका निवडणुका पाठोपाठ आता पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीतही इव्हीएम मशीनमध्ये गोंधळ झाल्याचे समोर येत आहे. त्यासंदर्भात माजी  निवडणूक आयुक्तांशी दि.16 ते 18 एप्रिल दरम्यान दिल्ली येथे चर्चासत्र आयोजीत करण्यात येणार आहे.

भारतात संविधानानुसार भारतात राहणारी कोणतीही व्यक्ती  निवडणूक लढवू शकते मात्र सध्या घटनाबाह्य निवडणुका होत आहेत. निवडणूक प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. त्यसाठी राष्ट्रीय पातळीवर जनआंदोलन करणे गरजेचे आहे.त्यासाठी प्रत्येकाने एकत्र येऊन या जनआंदोलनात सहभागी झाले पाहीजे, असे आवाहनही त्यांनी या पत्रातून केले आहे.

आण्णांच्या या पत्रानंतर श्रीजीत रमेशन यांनी उपोषण मागे  घतले. तसेच जिल्हाधिकारी सौरभ राव यांनीही या उपोषणात केलेल्या मागणींची दखल घ्यावी व संबंधीत तक्रारींची चौकशी लवकरात-लवकर करावी अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. दरम्यान रमेशन यांनी केंद्रीय निवडणूक आयोग व  देशाचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनाही पत्र लिहले आहे. त्यामध्ये त्यांनी इव्हीएम मशीन बंद करण्यात याव्यात त्याजागी 2013 साली  सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्या प्रमाणे  व्हीव्हीपीएटी मशीनचा वापर करावा अथवा बॅलेट पेपरचा वापर करावा. तसेच निवडणूक काळात होणा-या गैरव्यवहाराच्या विऱोधात चौकशी करण्यासाठी विशेष तज्ज्ञ समितीची नेमणूक करावी. ज्यामध्ये अभियंता, समाज सेवक, निवृत्त अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते,  सामान्य नागरीक आदींचा समावेश असावा, अशी मागणी केली आहे.

तसेच त्यांनी म्हटले आहे की, मला राजकीय, सामाजिक अशा सर्व स्तरातून लिखित पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे वरील मागण्या मान्य नाही झाल्या तर महाराष्ट्र बंद पुकारण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

""

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.